कागदपत्रांविना कर्ज देत कर्जदारांची पिळवणूक; तळोजात महिलेची तक्रार

कागदपत्रांविना कर्ज देत कर्जदारांची पिळवणूक; तळोजात महिलेची तक्रार

पनवेल : लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहात का? आपल्याला कर्जाची आवश्‍यकता आहे का? मग आमचे ऍप डाउनलोड करा आणि तात्काळ कर्ज मिळवा. तेदेखील कोणत्याही कागदपत्रांशिवाय, अशा आशयाच्या जाहिरातींना भुलून कर्ज घेतल्यावर फसले गेल्याचे लक्षात आल्याने तळोजा फेस 2 येथे राहणाऱ्या एका महिलेस तळोजा पोलीस ठाणे गाठावे लागले आहे. 

लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेल्याने व उत्पन्न कमी झाल्याने कोणत्याही कागदपत्रांशिवाय सहज ऑनलाईन कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या ऍपच्या जाहिरातींनी सध्या समाज माध्यमांवर धुमाकूळ घातला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेले अनेकजण सहज कर्जाच्या अपेक्षेने या जाळ्यात अलगद अडकत आहेत. अशा नागरिकांना सुरूवातीला सहज कर्ज उपलब्ध करून देत नंतर कर्ज वसुलीच्या नावावर या कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून त्यांची पिळवणूक होत आहे. तरीदेखील सुरूवातीला सहज पैसे उपलब्ध होत असल्याने अनेक नागरिक या संभाव्य धोक्‍याकडे दुर्लक्ष करत असल्याचेही समोर येत आहे; मात्र शेवटी कंपन्यांच्या प्रतिनिधींचा त्रास सहन करण्यापलीकडे गेल्यानंतर अशा नागरिकांना पोलिस ठाणेच गाठावे लागत असल्याचे प्रकार पनवेल परिसरात घडत आहेत. 

असे मिळते सहज कर्ज 
1)कर्ज घेण्यासाठी ऍप डाउनलोड करण्यास सांगितले जाते 
2) नंतर ऍपवरील तुमची सर्व माहिती कंपनीला वापरण्याची परवानगी मागितली जाते. 
3) परवानगी मिळताच पॅनकार्ड तसेच आधारकार्डचे फोटो व कर्जदार व्यक्तीचा फोटो उपलोड करण्यास सांगितले जाते. 
4) ही माहिती उपलोड होताच काही मिनिटे अथवा तासातच व्याजाचे पैसे व इतर काही पैसे कापून उरलेली रक्कम ठराविक वेळेत परत करण्याच्या अटीवर ऑनलाईन पद्धतीने कर्जदाराच्या खात्यात जमा केली जाते. 

...मग सुरु होतो खेळ 
सहज कर्ज उपलब्ध झाले म्हणून आनंदात असलेल्या कर्जदाराला आपण पुरते अडकले गेलोय हे कळेपर्यंत बराच कालावधी उलटून गेलेला असतो. या कालावधीत आपल्याकडील माहिती कंपनीला उपलब्ध होते. त्याआधारे एक हप्ता थकवला तरी आपल्या परिचितांना कॉल करून आपण कसे खोटे आहात, असे सांगत शिवीगाळ करण्यासोबत आपल्या परिचितांचे वेगवेगळे व्हॉट्‌सअप ग्रुप बनवून त्याआधारे कर्जदाराला शिवीगाळ करण्याचे प्रकार केले जात आहेत. 

तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज 
तळोजा फेस 2 येथे राहणाऱ्या युवतीला नुकताच या प्रकारचा अनुभव आल्याने शिवीगाळ तसेच परिचितांकडे बदनाम करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रकारे अनेक नागरिकांची पिळवणूक होत असल्याची शक्‍यता यानिमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे. 

पोलिसांच्या सायबर क्राईम विभागात दररोज अशा प्रकारच्या विविध तक्रारी दाखल होत असतात. तळोजा पोलीस ठाण्यात दाखल झालेली तक्रार नेमकी कोणत्या प्रकारची आहे हे प्रत्यक्ष माहिती घेऊनच सांगता येईल. 
- जयराज छाप्रिया,
वरिष्ठ पोलिस निरिक्षक, सायबर क्राईम विभाग.

Extortion of borrowers by giving loans without documents Complaint of a woman in panvel

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com