शेतीपंपांसाठी वापरली 2 हजार कोटींची जादा वीज

किरण कारंडे
मंगळवार, 10 जानेवारी 2017

रब्बी हंगामात युनिटमागे 16 पैशांचा बोजा वाढणार

रब्बी हंगामात युनिटमागे 16 पैशांचा बोजा वाढणार
मुंबई - राज्यातील कृषिपंप वीजग्राहकांनी सप्टेंबर ते डिसेंबर या रब्बी हंगामाच्या कालावधीत दोन हजार कोटींची जादा वीज वापरली आहे. शेतीसाठी 12 तास वीज दिल्यामुळे महावितरणच्या इतिहासात रब्बी हंगामात सर्वाधिक वीज वापरली गेली. जास्त वीज वापरल्यामुळे ग्राहकांसाठी युनिटमागे 16 पैशांचा बोजा वाढण्याचे संकेत आहेत. राज्यातील 40 लाख कृषिपंप वीजग्राहकांसाठी आठ तासांऐवजी 12 तास वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

रब्बी हंगामात 16 हजार मेगावॉट विजेची मागणी होती. यंदाच्या हंगामात सातत्याने ही विजेची मागणी सरासरी 17 हजार 300 मेगावॉटच्या घरात होती. रब्बी हंगामातील कमाल विजेची मागणी 18 हजार 300 मेगावॉटपर्यंत पोचली. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत 30 दशलक्ष युनिट इतकी जादा वीज वापरण्यात आली. राज्य सरकार या अतिरिक्त विजेचे पैसे देणार आहे. त्यामुळेच ही अतिरिक्त वीज देण्यात आली. रब्बी हंगामात पुरेशी वीजही उपलब्ध होती. राज्यात अतिरिक्त वीज असल्यानेच 12 तास वीज देणे शक्‍य झाले, अशी माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

शेतकऱ्यांकडे वाढणारी वीजबिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे; पण सामाजिक जबाबदारी म्हणून महावितरणने राज्य सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा देण्याचे ठरवले. शेतकऱ्यांकडील वीजबिलाच्या थकबाकीने आता 13 हजार कोटींचा आकडा ओलांडला आहे.

"ऑक्‍टोबर हीट'मधील आव्हान
"ऑक्‍टोबर हीट'चे आव्हान असतानाही कमाल वीजमागणीच्या काळात महावितरणने 18 हजार मेगावॉटपर्यंत वीजपुरवठा केला. या वेळी रब्बी हंगामात शेतीपंपांसाठी जादा वीज वापरल्यामुळे विजेच्या कमाल मागणीची वेळही बदलली. नेहमी सकाळी विजेची मागणी जास्त असते. रब्बी हंगामात मात्र सायंकाळी विजेची मागणी वाढली होती. त्यामुळे वीजपुरवठा करण्याचे आव्हान आणखी कठीण झाले होते; पण राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असल्यामुळे भारनियमनाची वेळ आली नाही.

Web Title: extra electricity use for agriculture pump