फेसबुक, ट्विटरवरून तक्रारींचा पाऊस 

दीपक शेलार - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 9 जानेवारी 2017

ठाणे - येथील पोलिसांच्या सोशल मीडिया विभागाकडे दहा महिन्यात नागरिकांनी तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. फेसबुक आणि ट्विटरवरून नागरिकांनी तब्बल 1 हजार 715 तक्रारी नोंदवल्या आहेत. यात सर्वाधिक तक्रारी वाहतूक विभागाशी निगडित असून पोलिसांशी संबंधित नसलेल्या विभागाच्या तक्रारीही येथे आल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या सोशल मीडिया विभागाने दिली. 

ठाणे - येथील पोलिसांच्या सोशल मीडिया विभागाकडे दहा महिन्यात नागरिकांनी तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. फेसबुक आणि ट्विटरवरून नागरिकांनी तब्बल 1 हजार 715 तक्रारी नोंदवल्या आहेत. यात सर्वाधिक तक्रारी वाहतूक विभागाशी निगडित असून पोलिसांशी संबंधित नसलेल्या विभागाच्या तक्रारीही येथे आल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या सोशल मीडिया विभागाने दिली. 

ठाणे पोलिस आयुक्तालयात मागील वर्षी 1 मार्चला सोशल मीडिया सेलची स्थापना झाली. या उपक्रमांतर्गत पोलिस आयुक्तालयाचे फेसबुक पेज आणि ट्विटर हॅण्डल सुरू करण्यात आले. यातील फेसबुक पेजला दहा महिन्यांत तब्बल 20 हजार 534 लाईक्‍स मिळाल्या असून फेसबुक पेज 48 हजार 312 लोकांपर्यंत पोहचले आहे, तर ट्विटर हॅण्डलचे 10 हजार 915 फॉलोअर्स असून ते 28 हजार 600 लोकांपर्यंत पोहचले आहे. दहा महिन्यांत फेसबुकवर एकूण 68 तक्रारी आल्या. यात नऊ वाहतुकीसंदर्भातील 28 पोलिस ठाण्याशी निगडित आणि 27 तक्रारी ठाणे ग्रामीण पोलिस क्षेत्राशी संबंधित आहेत. ट्विटरवरून आलेल्या एक हजार 647 तक्रारींमध्ये एक हजार 98 तक्रारी शहर वाहतूक शाखेबाबत, 41 तक्रारी पोलिस ठाण्याशी संबंधित आहेत आणि 354 तक्रारी इतर आहेत. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या महाभागांनी चक्क ठाणे महापालिका आणि रेल्वेबाबतच्या 158 तक्रारी पोलिसांकडे केल्या आहेत. 

इफेड्रिन प्रकरणात सोशल मीडियाचा वापर 
कोट्यवधीच्या इफेड्रिन ड्रग प्रकरणातील आरोपींविरोधात पुरावे शोधण्यासाठी ठाणे पोलिसांकडून सोशल मीडियाचा आधार घेतला होता. या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी, ड्रग तस्कर विकी गोस्वामीसह इतर आरोपींचे फेसबुक अकाऊंट, व्हॉट्‌स ऍप संवाद आदींच्या माध्यमातून ठोस पुरावे उभे करण्यात आले होते. या आरोपींनी केलेल्या दुबई, केनिया आणि आफ्रिकन देशांतील पर्यटनाचे दुवे मिळवण्याचा प्रयत्नही या माध्यमातून झाला होता. 

ठाणे पोलिसांचे "पोलिस मित्र' आणि "प्रतिसाद' हे ऍप आहेत; मात्र त्यांना नागरिकांकडून हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यासाठी व्हॉट्‌सअप क्रमांकासह ट्विटर आणि फेसबुक पेज सुरू केले आहे. येथे नोंदवलेल्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन पोलिस सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार सोशल मीडिया सेल पाठपुरावा करीत असतो. याशिवाय प्रत्येक आठवड्याला वेगवेगळी कल्पना राबवली जाते. 
- सुखदा नारकर, पोलिस निरीक्षक, पोलिस जनसंपर्क अधिकारी 

Web Title: Facebook Twitter Complaints