जानकी सभागृहात सुविधांचे तीनतेरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली, सेक्‍टर ५ येथील श्रीमती जानकीबाई कृष्णा मढवी मंगल कार्यालयाचे नुकतेच मोठ्या थाटामाटात उद्‌घाटन करण्यात आले; परंतु येथील वातानुकूलन यंत्रणा तसेच उद्‌वाहन (लिफ्ट) वारंवार बंद पडत असल्यामुळे सभागृहातील सोयी-सुविधांचे तीनतेरा वाजले आहेत. 

तुर्भे - नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली, सेक्‍टर ५ येथील श्रीमती जानकीबाई कृष्णा मढवी मंगल कार्यालयाचे नुकतेच मोठ्या थाटामाटात उद्‌घाटन करण्यात आले; परंतु येथील वातानुकूलन यंत्रणा तसेच उद्‌वाहन (लिफ्ट) वारंवार बंद पडत असल्यामुळे सभागृहातील सोयी-सुविधांचे तीनतेरा वाजले आहेत. 

शहरातील सामान्य नागरिक वाजवी किमतीत चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून या मंगल कार्यालयाचे बुकिंग करतात; परंतु येथील सोयीसुविधा पाहता नागरिकांची निराशा होत आहे. काही दिवसांपूर्वी ऐरोलीतील नागरिकाने कार्यक्रमासाठी वातानुकूलित सभागृहाचे बुकिंग केले होते; परंतु ऐनवेळी येथील वातानुकूलित सेवा बंद पडली. त्यामुळे उपस्थित २०० हून अधिक पाहुणेमंडळीला घामाघूम होत कार्यक्रम उरकून काढता पाय घ्यावा लागला; तर दोनच दिवसांपूर्वी मंगल कार्यालयातील उद्‌वाहन अचानक बंद पडल्याने लग्नकार्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींचे हाल झाले.

या वेळी या लिफ्टमध्ये कॅटरर्सचा एक माणूस तब्बल दीड तास अडकून पडला होता. या कालावधीमध्ये त्याचा मोबाईल फोन बंद झाल्याने त्याच्याशी संपर्क व्हावा किंवा तो गुदमरू नये म्हणून लिफ्टमध्ये मोठा चमचा घुसविण्यात आला होता. लिफ्ट बंद पडल्यावर तत्काळ चालू कशी करावी, याबाबत तेथील कर्मचाऱ्यांना तांत्रिक माहिती नसल्याने दीड तास तो माणूस अडकून पडला.

या मंगल कार्यालयात स्वच्छतेचाही अभाव असल्याचे दिसून येतो. सुरुवातीच्या वर जाणाऱ्या पायऱ्यांपासून ते मंगल कार्यालयापर्यंत अस्वछता दिसून येते. 

त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या सभागृहात देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.पालिका प्रशासनाने या बाबींकडे वेळीच लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मनसे उपशहर अध्यक्ष नीलेश बाणकिले यांनी प्रशासनाकडे केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facilities issue at Janaki Hall