पालीत स्वच्छतागृहाअभावी नागरिकांची कुचंबणा

अमित गवळे : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत, ही खूप मोठी समस्या आहे.

पाली : अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत, ही खूप मोठी समस्या आहे. स्वच्छतागृहाअभावी शासकीय कामांसाठी किंवा खरेदीसाठी बाजारात आलेले नागरिक व भाविक यांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे पालीत महत्त्वाच्या ठिकाणी, तसेच नाक्‍यांवर सार्वजनिक स्वच्छतागृह व मुताऱ्या बांधण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सुधागड तालुक्‍यातील पाली हे मुख्यालयाचे ठिकाण आहे. त्यामुळे तालुक्‍यातील नागरिक रोजची खरेदी, शासकीय कामे करण्यासाठी; तसेच विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी पालीत येतात. अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असल्याने असंख्य भाविकांचीही येथे वर्दळ असते. मात्र, बाजारात फिरतेवेळी किंवा कुठे जाताना नैसर्गिक विधी करायचे झाल्यास कुठे जावे? हा प्रश्न त्यांना पडतो. कारण पालीत कुठेच सार्वजनिक स्वच्छतागृह किंवा मुताऱ्या नाहीत. मग अक्षरशः पोट दाबूनच त्यांना हा त्रास सहन करावा लागतो. ज्या व्यापाऱ्यांच्या दुकानात स्वच्छतागृह नाहीत त्यांचीदेखील गैरसोय होते. मधुमेही व मूतखडा असलेल्या नागरिकांना तर खूप त्रास होतो. एकवेळ पुरुष कुठेतरी निभावून घेतात; मात्र वृद्ध व स्त्रियांचे खूपच हाल होतात. पालीत बल्लाळेश्वर देवस्थानच्या वतीने भक्तनिवास क्रमांक १ जवळ स्वच्छतागृह व मुतारी आहे; मात्र भाविकांसाठी ते बनवले आहेत. भाविकांबरोबरच जवळचे काही नागरिक व व्यावसायिक त्यांचा वापर करतात; मात्र पादचारी व इतरांना त्यांचा वापर करणे शक्‍य नाही. 

अटीतटीच्या वेळी काही नागरिक बसस्थानकातील स्वच्छतागृहाचा उपयोग करतात; मात्र त्या स्वच्छतागृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. तिथे नियमित अस्वच्छता असते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असते. शिवाय, बसस्थानकापासून दूरवर असलेल्या नागरिकांना त्याचा काही फायदा नाही. त्यामुळेच पालीत ठराविक ठिकाणी स्त्रिया व पुरुषांसाठी मुताऱ्या, स्वच्छतागृह असणे ही अतिशय महत्त्वाची गरज निर्माण झाली आहे. 

जुन्या मुताऱ्यांची दुरवस्था
काही वर्षांपूर्वी पालीत ठिकठिकाणी जसे जुने पोलिस ठाणे, मधली आळीतील लवाटे चौक आदी ठिकाणी सार्वजनिक मुताऱ्या होत्या. काही ठिकाणी सिमेंटच्या वाहिनीच्या मुताऱ्याही होत्या. त्यामुळे नागरिकांची काही प्रमाणात सोय होत होती; मात्र सध्या या मुताऱ्यांची पडझड झाली आहे. त्या वापरण्यायोग्य राहिलेल्या नाहीत. परिणामी, नव्याने मुताऱ्या व स्वच्छतागृहाची गरज निर्माण झाली आहे.

पालीत सार्वजनिक स्वच्छतागृह असणे आवश्‍यक आहे; मात्र ग्रामपंचायतीकडे त्यासाठी लागणारा निधी नाही. तरीदेखील जागा उपलब्ध झाल्यास आम्ही स्वच्छतागृह बनवू. तसेच, काही दाते किंवा कंपन्यांकडून फायबरचे फिरते स्वच्छतागृह मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही.
- गणेश बाळके, सरपंच, ग्रामपंचायत, पाली

जेव्हा पालीत येतो, तेव्हा स्वच्छतागृहाअभावी नेहमीच गैरसोय होते. आजारी माणूस किंवा स्त्रियांचीही यामुळे मोठी परवड होते. किमान मोक्‍याच्या ठिकाणी तरी सार्वजनिक मुतारी किंवा स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे. 
- दिलीप सोनावणे, पर्यटक

पालीत सार्वजनिक मुतारी व स्वच्छतागृह नसल्याने अनेकांची गैरसोय होते. बाहेरगावाहून आलेले लोक, पादचारी आणि भाविक यांचे यामुळे हाल होतात. त्यामुळे पालीत किमान दोन ठिकाणी नाक्‍यांवर तरी मुतारी किंवा स्वच्छतागृह बांधणे आवश्‍यक आहे. 
- प्रशांत शेठ, व्यापारी, पाली
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facility of Public Toilet is not available in Pali