धामणीत एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

 सावरोली-खारपाडा मार्गावर धामणीनजीक एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.

खालापूर (बातमीदार) : सावरोली-खारपाडा मार्गावर धामणीनजीक एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

खालापूर हद्दीत धामणी गावानजीक विश्‍वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. येथे सुरक्षा रक्षक नसल्याचे तसेच संध्याकाळी हा भाग निर्मनुष्य असल्याचे हेरून चोरट्यांनी शुक्रवारी (ता. ८) रात्री २ च्या सुमारास धारदार वस्तूने एटीएम कापण्याचा प्रयत्न केला; परंतु मशीनमध्ये ठेवलेल्या रकमेपर्यंत पोहचण्यात चोरट्याला यश मिळाले नाही. अखेरीस चोरट्यानी त्याच अवस्थेत पळ काढला. 

एटीएम कापण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आल्यानंतर बॅंक व्यवस्थापकांनी खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. एटीएममध्ये नक्की किती रक्कम होती, याचा तपशील मिळाला नसून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्‍वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमित सावंत करीत आहे.

सीसीटीव्ही तपास सुरू
सीसी टीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू असून, चोरट्यांनी या ठिकाणी पाळत ठेवून चोरीची डाव आखला असला तरी लवकरच चोरट्यांना पकडण्यात यश येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Failed attempt to break ATM