esakal | नवी मुंबई : बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने न्यायालयाची फसवणूक | Fake Documents
sakal

बोलून बातमी शोधा

fake documents

नवी मुंबई : बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने न्यायालयाची फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : छळवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपींना दोन बोगस जामीनदार (fake witness) महिलांनी बनावट कागदपत्रांच्या (fake documents) सहाय्याने जामीन दिल्याचा प्रकार सीबीडी-बेलापूर येथील न्यायलयात (belapur court) उघडकीस आला आहे. छळवणुकीच्या गुन्ह्यातील तक्रारदार विवाहितेने माहितीच्या अधिकारातून (RTI) बोगस जामीनदार महिलांची बनावटगिरी उघड केली आहे. त्यानंतर सीबीडी पोलिसांनी (cbd police) न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणातील जामीनदार महिलांविरोधात गुन्हा दाखल (FIR) केला आहे.

हेही वाचा: दागिना बाजार येथे बंगाली बांधवांच्या रक्तदानाने ३११ युनिट रक्त संकलन

सीबीडी येथील न्यायालयात याआधीही बनावट कागदपत्र व खोट्या नावाने आरोपींना जामीन देण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सीबीडी येथील न्यायालयात बोगस जामीनदार आणि बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून आरोपींना जामिन मिळवून देणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा आहे. वाशीत राहणारी विवाहिता प्रियांका सिंग (३२) हिचा लग्नानंतर काही दिवसातच सासरकडील मंडळीकडून मानसिक व शारीरीक छळ होऊ लागल्याने तिने ऑक्टोबर २०२० मध्ये पतीसह सासू सासरे व दीर, दिराची पत्नी या सर्वांविरोधात वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

त्यावेळी वाशी पोलिसांनी प्रियांकाच्या सासरकडील मंडळीविरोधात गुन्हा दाखल करून पती रोहित सत्यानंद सिंग (३८) व दिर रतन सत्यानंद सिंग (४०) या दोघांना अटक केली होती. सीबीडी न्यायालयातील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना प्रत्येकी १५ हजार रुपये वैयक्तिक जातमुचलका व तेवढ्याच रक्कमेची सॉल्वन्सी देऊन जामीन मंजुरीचा आदेश दिला होता. २३ नोव्हेंबर रोजी दोन्ही आरोपींनी सनोफर अरबाज खान (२७) व हमिदा युसूफ खान (४०) या दोन महिलांना जामीनदार म्हणून न्यायालयात हजर केले होते.

हेही वाचा: एनसीबीच्या परवानगीने लॉकअपमध्ये बाप-लेकाची झाली भेट

त्यावेळी सनोफर खान व हमिदा खान या दोघींनी कल्याण नगरपरिषदेची प्रॉपर्टी टॅक्स पावती, अंबरनाथ नगरपरिषद प्रॉपर्टी टॅक्स पावती, आधारकार्ड, रेशनकार्ड ही कागदपत्रे न्यायालयात सादर केल्‍याने आरोपींचा जामीन मंजूर झाला होता. मात्र या जामिनाबाबत प्रियंका सिंग हिला संशय आल्याने तिने जानेवारी महिन्यात अंबरनाथ नगरपरिषद व कल्याण डोंबिवली महापालिका व शिधावाटप अधिकारी कार्यालयात माहिती अधिकार कायद्यांतर्गत जामीनदार सनोफर खान व हमिदा खान यांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती मागविली होती.

त्यावेळी दोन्ही जामीनदार महिलांनी सादर केलेली कागदपत्रे ही बनावट असल्याचे उघड झाले.
प्रियांका सिंग हिने सीबीडी येथील न्यायालयात बोगस जामीनदार सनोफर खान व हिमदा खान यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याबाबत सरकारी वकीलामार्फत विनंती अर्ज केला होता. त्यानंतर न्यायाधिशांनी वाशी पोलिसांना या प्रकरणातील दोन्ही जामिनदाराच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार वाशी पोलिसांनी कागदपत्रांची पडताळणी केली असता, दोन्ही जामीनदार दिलेल्या पत्त्यावर राहात नसल्याचे तसेच त्यांनी सादर केलेल्या टॅक्स पावत्या आणि रेशनकार्ड देखील संबंधित कार्यालयाकडून देण्यात आले नसल्याचे आढळले. न्यायालयाची फसवणूक केल्याने बोगस जामिनदारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मार्च महिन्यात मलंग महम्मद शेख या व्यक्तीने बनावट नाव व बनावट कागपत्रांद्वारे आरोपीला जामीन देण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी न्यायाधीशांनी संशयावरून कागदपत्रे तपासून त्याला सीबीडी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर सदर आरोपीने ४ ते ५ आरोपींना जामीन दिल्याचे उघडकीस आले होते. जून महिन्यामध्ये भावेश राकेश म्हात्रे (२७) याने न्यायालयात बनावट कागदपत्रांच्या सहायाने बांगलादेशी महिला आरोपीला जामीन देण्याचा प्रयत्न केला होता. ऑगस्ट महिन्यात बनावट नावाने व बनावट कागदपत्रांच्या सहायाने आरोपीला जामीन देण्याच्या प्रयत्नात असलेल्या इकबाल इस्माईल पटेल (४७) या व्यक्तीला देखील न्यायालयाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

loading image
go to top