बनावट पासपोर्टप्रकरणी झारखंडच्या तरुणास अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मुंबई - बनावट पासपोर्टप्रकरणी झारखंडमधील तरुणाला सहार पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. महंमद अनीस महंमद शेख असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. 

मुंबई - बनावट पासपोर्टप्रकरणी झारखंडमधील तरुणाला सहार पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. महंमद अनीस महंमद शेख असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. 

एजंटद्वारे बनावट पासपोर्ट तयार करून परदेशात नोकरीकरिता जाण्याचे प्रकार वाढत आहेत. आठवड्यापूर्वी गुजरातमधील महिलेने कॅनडा येथे पतीला भेटायला जाण्याकरिता नावात बदल करून बनावट पासपोर्ट बनवला होता. तिला कॅनडाच्या विमानतळावर पकडण्यात आले. नंतर तिला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. सहार पोलिसांनी अटक केलेला महंमद मूळचा झारखंडचा आहे. तो दुबईत नोकरीला होता. मात्र, काही कारणात्सव त्याचे पासपोर्ट रद्द करून त्याला भारतात पाठवण्यात आले होते. नोकरीची गरज असल्याने त्याने नाव बदलून बनावट पासपोर्ट तयार केले. आठवड्यापूर्वी महंमद दुबईला गेला. तेथील अधिकाऱ्यांनी त्याच्या पासपोर्टची तपासणी केली. संशय आल्याने अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. मात्र, पासपोर्ट बनावट असल्याची कबुली तो देत नव्हता. अखेर विमानतळावर बायोमेट्रिक तपासणी केल्यानंतर पासपोर्ट बनावट असल्याचे उघड झाले. त्याला पुन्हा भारतात पाठवले. मंगळवारी रात्री महंमद सहार विमानतळावर आल्यानंतर त्याला अटक केली, अशी माहिती सहार पोलिसांनी दिली. 

Web Title: Fake passport case of a young man arrested in Jharkhand