लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून गंडा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

मुंबई - "जीवनसाथी' व "शादी डॉट कॉम' या संकेतस्थळांवर बनावट प्रोफाईल तयार करून 25 हून अधिक महिलांची 50 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या ठकसेनाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याविरोधात चारकोप, बीकेसी, नवी मुंबईतील कोपरखैरणे व पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

कृष्णा चंद्रसेन देवकाते (31) असे आरोपीचे नाव असून, तो बीपीओमध्ये कामाला आहे. सरकारी नोकरी असल्याचे भासवून तो मुलींना जाळ्यात ओढायचा. चारकोप येथील 37 वर्षीय महिलेने "जीवनसाथी डॉट कॉम'वर नोंदणी केली होती. त्यावर जानेवारीमध्ये "ट्राय' या सरकारी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाकडून रिक्‍वेस्ट आली. प्रोफाईल चांगली असल्यामुळे तिने रिक्‍वेस्ट स्वीकारली व ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला. तसेच प्रत्येकवेळी वैयक्तिक अडचण सांगून तिच्याकडून पैसे घेतले. तसेच तिच्या क्रेडिट कार्डचाही वापर करून खरेदी केली. याप्रकरणी या महिलेने मेमध्ये चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या कक्ष-11 च्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी कल्याणमध्ये राहत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी कार्यालयात आणले. त्यावेळी त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याआधी नालासोपारा येथेही त्याला अशाच गुन्ह्यात अटक झाली होती, पण तेथून जामिनावर सुटल्यावर त्याने पुन्हा असे गुन्हे करण्यास सुरुवात केली. 

Web Title: Fake profile on matrimonial sites