The fall of the work of the Vadol bridge has emerged in the General Assembly
The fall of the work of the Vadol bridge has emerged in the General Assembly

वडोल पुलाच्या कामाचे पडसाद महासभेत उमटले

उल्हासनगर : ठेकेदाराला वारंवार मुदत देण्यात आली पण पुलाचे काम पूर्ण झालेच नाही. 15 जूनपर्यत काम पूर्ण होणार अन्यथा ठेकेदारावर कारवाई करण्यात येणार असे लेखी आश्वासन आयुक्त गणेश पाटील यांनी दिले. परत 30 तारखेपर्यंत विहित मुदत ठेकेदाराला देण्यात आल्यावरही पुलाची अवस्था जैसे थे असल्याच्या निषेधार्थ आज पार पडलेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांना जाब विचारला. तेंव्हा ठेकेदारावर नोटीस बजावण्याची कारवाई करून येत्या दहा दिवसात पुलाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन आयुक्त गणेश पाटील यांनी दिले.

वालधुनी नदीवरील वडोल पुलाचे काम तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे, माजी उपमहापौर पंचशीला पवार यांच्या कालावधीत दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. मात्र त्यास गती मिळत नसल्याने अशोका फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी रगडे, नगरसेवक टोनी सिरवानी, नगरसेविका सविता तोरणे-रगडे यांनी उपोषण सुरू केले होते. त्यावर 15 जून पर्यंत पुलाचे काम पूर्ण होणार असे लेखी आश्वासन आयुक्त गणेश पाटील यांनी दिले होते. तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हणून मातीचा पूल बनवून आणि त्यावर फळ्या टाकून येण्याजण्याचा मार्ग करण्यात आला होता. मात्र हा पुलही दोन दिवस पडलेल्या पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेल्याने चक्क अर्धवट असलेल्या पुलाला सीडी लावून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ वडोल गावकऱ्यांच्या नशिबी आली. त्यावर अशोका फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी रगडे यांनी दालनात गोंधळ घातल्यावर ठेकेदाराच्या विनंतीनुसार त्याला 30 जूनची विहित मुदत आयुक्तांनी दिली होती. पण 30 जून उलटून गेल्यावरही काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांनी ठेकेदाराला फैलावर घेताना काम बंद पाडले.

आज पार पडलेल्या महासभेत स्थानिक नगरसेविका सविता तोरणे-रगडे यांनी आक्रमक पवित्रा घेताना आपण दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? 30 जून ही तारिख निघून गेली? ठेकेदारावर कोणती कारवाई केली? अशा प्रश्नांची सरबत्ती केल्यावर शिवसेना नगरसेवक राजेंद्र चौधरी, भाजपचे राजेश वधारिया डॉ. प्रकाश नाथानी, साई पक्षाचे टोनी सिरवानी, गजानन शेळके, राष्ट्रवादीचे सतरामदास जेसवानी, पीआरपीचे प्रमोद टाले, काँग्रेसच्या अंजली साळवे यांनी वडोलपुलाची जीवघेण्या कहाणीवर प्रकाशझोत टाकताना आयुक्तांना जाब विचारला. या दोन वर्षात नदीत तीन निरपराध वाहून गेलेत, ठेकेदारावर कारवाई का करत नाही अशी पुन्हा विचारणा सविता तोरणे-रगडे यांनी केल्यावर थेट कारवाई करता येत नाही, प्रथम नोटीस बजावण्यात येणार आणि दहा दिवसात पुलाचे काम पूर्ण केले जाणार असे आश्वासन देताना सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त गणेश पाटील यांनी केले.

दरम्यान अशोका फाऊंडेशनचे शिवाजी रगडे यांनी आयुक्त गणेश पाटील यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेताना आयुक्तांवर भादवी कलम 119 व 415 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे केली आहे. आयुक्तांनी दिलेल्या लेखी आश्वास नंतरही विहित मुदतीत पुलाचे काम पूर्ण करण्यात आले नसून ठेकेदारा विरोधात कारवाई करण्याऐवजी ते ठेकेदाराचा चालढकलपणा पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com