टँकरमधील घातक रसायन पडल्याऩे कुटुंब भाजले

सुचिता करमरकर
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

कल्याण : घातक रसायनांची वाहतूक करताना पुरेशी काळजी न घेतल्याचा परिणाम कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाला भोगावा लागला आहे. सोमवारी (ता.25) रात्री उशिरा कल्याण पश्चिमेतील सुभाष पूल परिसरात हा अपघात घडला.

कल्याण : घातक रसायनांची वाहतूक करताना पुरेशी काळजी न घेतल्याचा परिणाम कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाला भोगावा लागला आहे. सोमवारी (ता.25) रात्री उशिरा कल्याण पश्चिमेतील सुभाष पूल परिसरात हा अपघात घडला. टँकर जवळून जाणाऱ्या दुचाकीवर टँकर मधील घातक रसायन पडल्याने गौरेश साळस्कर,पत्नी गौरी, तसेच दीड वर्षाचा मुलगा तनिष यांना भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. गौरेश यांच्या डोळ्यात रसायन गेल्यामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाला असून त्यांना मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

कल्याण पश्चिम परिसरातून शॉपिंग करून घरी परतत असताना सुभाष चौकात साळसकर कुटुंबियांचा हा अपघात झाला. बाजूने जाणाऱ्या टँकरचे झाकण योग्य पध्दतीने लावले नसल्याने आतील घातक रसायन बाहेर सांडले. त्यात गौरेश साळसकर यांच्या डोळ्याला जखमा झाल्या. अवघ्या काही सेकंदातच पुन्हा एकदा टँकर मधून घातक रसायन उडून गौरी तसेच तनिष यांच्या अंगावर सांडले. या तिघांनाही त्वरित कल्याणातील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र गौरेश यांच्या डोळ्यांवरील जखमा गंभीर स्वरूपाच्या असल्याने त्यांना त्वरित मुंबईच्या जेजे इस्पितळात  हलवण्यात आले. महात्मा फुले पोलिसांनी या संदर्भात अज्ञात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरातील खराब रस्त्याने आत्तापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत. रस्ता सुस्थितीत नसल्यानेच टँकरमधील रसायन हिंदकळून सांडले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घातक रसायनांची वाहतूक करताना पुरेशी काळजी न घेतल्यानेही असा अपघात घडू शकतो असे मतही व्यक्त होत आहे. पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीवी फुटेज मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 

Web Title: The family burn due to hazardous chemicals fall from tanker