लोकांनी खिलाडू वृत्तीने व्यंग्यचित्रांकडे पाहावे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

मुंबई - विनोदाकडे विनोद म्हणूनच किंवा व्यंग्यचित्रांकडे व्यंग्यचित्र म्हणूनच खिलाडू वृत्तीने पाहावे, असे मत नामवंत व्यंगचित्रकारांनी "सकाळ‘शी बोलताना मांडले. 

मराठा मोर्चांबाबत "सामना‘त प्रकाशित झालेल्या व्यंग्यचित्रावरून उसळलेल्या वादासंदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 

मुंबई - विनोदाकडे विनोद म्हणूनच किंवा व्यंग्यचित्रांकडे व्यंग्यचित्र म्हणूनच खिलाडू वृत्तीने पाहावे, असे मत नामवंत व्यंगचित्रकारांनी "सकाळ‘शी बोलताना मांडले. 

मराठा मोर्चांबाबत "सामना‘त प्रकाशित झालेल्या व्यंग्यचित्रावरून उसळलेल्या वादासंदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 

पाश्‍चात्त्य देशांत एखादे अगदी शृंगारिक व्यंग्यचित्र असले तरीही ते खिलाडू वृत्तीने घेण्याची संस्कृती आहे, ती आपल्याकडे यायला हवी, असे व्यंग्यचित्रकार विकास सबनीस म्हणाले. व्यंग्यचित्रांकडे वाचकांनी निकोप दृष्टीनेच पाहिले पाहिजे. आपल्याकडे अशा वादास राजकारणी वेगळेच वळण देतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. व्यंग्यचित्रात अगदीच कमरेखाली वार नसला तर ते खिलाडू वृत्तीने घ्यावे. मात्र "सामना‘तील व्यंग्यचित्रावरून राजकारण्यांनी एकमेकांना शह देण्याचा खेळ सुरू केला आहे, असेही ते म्हणाले. 

व्यंग्यचित्रासंदर्भात वाचक, राजकीय नेते आदी सर्वांनीच शांतपणे विचार करायला हवा. याबाबत प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार भूमिका घेत आहेत, असे सुरेश लोटलीकर म्हणाले. आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी असे चित्र दाखवणे योग्य आहे का, हे पाहायला हवे. हे व्यंग्यचित्र बाजूला ठेवले तरी अन्य मान्यवरांवर त्यातही महिलांवर टीका करणारी व्यंग्यचित्रेही छापू द्यावीत का, हेसुद्धा ठरवायला हवे. हल्ली व्यंग्यचित्र कशाला म्हणायचे, हेच लोक विसरले आहेत. व्यंग्यचित्रकाराने समाजातील विसंगती खेळकरपणे दाखवली पाहिजे, पण हल्ली तेदेखील होत नाही. त्यामुळे मी हल्ली मनातच व्यंगचित्रे काढतो, असे ते म्हणाले. 

व्यंग्यचित्र राजकीय नव्हते 
विवेक मेहेत्रे म्हणाले, की व्यंग्यचित्राकडे व्यंग्यचित्र म्हणून आणि विनोदाकडे विनोद म्हणून पाहिले जात नसेल, तर सरकारने सरळ व्यंग्यचित्रांवर बंदीच घालावी. मी "सामना‘तील त्या व्यंग्यचित्राच्या बाजूनेही नाही किंवा त्याच्या विरोधातही नाही. ते व्यंग्यचित्र काही अगदीच जहाल नाही. आज आपल्या जीवनात पुष्कळ ताणतणाव आहेत. त्यातून कुणी लोकांना क्षणभर हसवत असेल तर चांगलेच आहे; पण आज आपण हसणे विसरत आहोत, त्याची जागा वाद घेत आहे. दुसरे म्हणजे ते व्यंग्यचित्र राजकीय नव्हते, सर्वसामान्य होते किंवा ते एखाद्या गंभीर विषयावरील लेखातही टाकलेले नव्हते.

उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाबाबत परखड भूमिका मांडली आहे. आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आहे. ती मलाही मान्य आहे; पण काळानुसार काही नवीन प्रश्‍न समोर येतात. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. त्यात ऍट्रॉसिटी, आरक्षणाविषयी चर्चा होईल. काही गोष्टी अजाणतेपणी घडतात. माफी मागितल्यावर वाद मिटायला हवा. व्यंग्यचित्रकाराने याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. 
- संजय राऊत, खासदार व कार्यकारी संपादक- सामना

Web Title: The famous cartoonist Speak look to pics