रेणुकादेवीच्या भाविकांना एसटी पावली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

सौंदत्तीच्या यात्रेसाठी भाड्यात सवलत 

मुंबई : कोल्हापूर येथून सौंदत्तीला रेणुकादेवीच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने प्रवास भाड्यात सवलत जाहीर केली आहे. प्रासंगिक करारातील भाडे 50 वरून 34; तसेच खोळंबा आकार तासाला 98 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे यात्रेकरूंना दिलासा मिळणार आहे. 

दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला कर्नाटक राज्यातील सौंदत्ती येथे रेणुकादेवीच्या यात्रेसाठी कोल्हापूर शहरातून हजारो भाविक जातात. मागील तीन वर्षांपासून खासगी वाहतूक आणि कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बस सेवेला भाविकांकडून प्राधान्य दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याची दखल घेऊन रेणुकादेवी भाविकांचे शिष्टमंडळ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी एसटी महामंडळाकडे भाडेकपात करण्याची मागणी केली होती. त्यावरून महामंडळाने प्रासंगिक कराराचा दर आणि खोळंबा आकारात कपात करून भाविकांना दिलासा दिला. 

सौंदत्ती येथे 12 डिसेंबरला रेणुकादेवीच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकासाठी एसटी महामंडळाने नियोजन केले आहे. यात्रेसाठी कोल्हापूर शहरातून प्रासंगिक कराराच्या बसचे भाडे 50 रुपयांवरून 34 रुपये करण्यात आले आहे. खोळंबा आकारही तासाला 98 रुपयांवरून फक्त 10 रुपये करण्यात आला आहे. खासगी वाहतूक आणि कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बस सेवेशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. रेणुकादेवीच्या यात्रेसाठी 200 बसगाड्यांची व्यवस्था केल्याचे एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आले. 

 

कर्नाटकची बस सेवा बंद 
कर्नाटक परिवहन मंडळातर्फे तीन वर्षांपासून प्रासंगिक करारावर यात्रेकरूंसाठी सवलतीच्या दरात बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जात होत्या. या वेळी महाराष्ट्राचे एसटी महामंडळ पहिल्यांदाच रेणुकादेवीच्या भाविकांसाठी सवलतीच्या दरात बस सेवा पुरवणार आहे. त्यामुळे कर्नाटक परिवहन महामंडळातर्फे यंदा यात्रेसाठी बस सेवा दिली जाणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fare discount for Saundatti