'समृद्धी'विरोधात शेतकऱ्यांनी मुंबई - नाशिक महामार्ग रोखला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

शहापूर - नागपूर - समृद्धी महामार्गाचा विरोध कायम ठेवत तो अधिक आक्रमकपणे सरकारसमोर आणण्यासाठी बुधवारी इगतपुरी, कोपरगाव, नाशिक, अमरावती, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड येथील पाच हजार संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई- नाशिक महामार्ग चेरपोली गावाजवळ तासभर रोखून धरला. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

शेत शेतकरी बचाव लिहिलेल्या टोप्या परिधान करून निषेध नोंदवला. मराठवाड्याचे रामभाई बाहेती, इगतपुरीचे कचरू पाटील, माजी खासदार सुरेश टावरे, कुणबी सेनाप्रमुख विश्‍वनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी त्यासाठी काहीही करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन केले.

चालत जाऊन केले "जेल भरो'
आंदोलनात शेतकऱ्यांनी पोलिसांच्या गाड्यांत बसून जेल भरो आंदोलन केले. पोलिसांच्या गाड्यांतील आंदोलकांना शहापुरातील वैश्‍य समाज हॉल येथे नेण्यात आले. पोलिसांच्या गाड्या कमी पडल्याने शेकडो शेतकरी वैश्‍य समाज हॉलमध्ये चालत येऊन जेल भरो आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

सामाजिक दबावासाठी चर्चासत्र
पत्रकारांशी बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी या महामार्गाचे जमिनीचे अधिग्रहण बेकायदा चालू असल्याने शेतकरी प्रशासनाला कुठल्याही प्रकारचे सहकार्य करणार नाहीत, असे स्पष्ट केले. फडणवीस सरकारवर हा महामार्ग रद्द करण्यासाठी सामाजिक दबाव निर्माण व्हावा यासाठी मुंबई, ठाण्यात चर्चासत्र घेण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला. शेतकरी विकासविरोधी नाहीत; पण शेतकरी कायमच गुलामगिरीत राहावा असेच सरकारला वाटते काय, असा प्रश्‍न त्यांनी केला.

Web Title: farmer agitation for samruddhi