बोर्डीत बळीराजाला वरुणराजाच्या जाण्याची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

अवकाळी पावसाने भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. शेतातील भात कापणीस आला असतानाही पावसाची टांगती तलवार कायम असल्याने कापणीची कामे थांबली आहेत.

बोर्डी (बातमीदार) : अवकाळी पावसाने भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. शेतातील भात कापणीस आला असतानाही पावसाची टांगती तलवार कायम असल्याने कापणीची कामे थांबली आहेत. कामे खोळंबल्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले असून ते वरुणराजाच्या जाण्याची प्रतीक्षा करत आहेत.

मागच्या वर्षी पावसाने काढता पाय घेतल्याने भातशेती उत्पादन घटल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक तोटा सोसावा लागला होता. यंदा खरीप हंगामात पाऊस उशिरा सुरू झाला; मात्र भातशेतीसाठी तो उपयुक्त असल्याने शेतीची कामेही सुरळीत पार पडली. एकंदर मागच्या वर्षीचा तोटा यंदा भरून निघेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी सहकारी सोसायट्या, बॅंकांकडून कर्ज घेऊन भाताची लागवड केली. घरातील सर्व सदस्यांच्या परिश्रमाचे फळ मिळण्याची आशा असतानाच सप्टेंबरच्या अखेरीस भातशेतीवर लष्करी अळीचा हल्ला झाला. त्यातूनही लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील होता; मात्र निसर्गच कोपला तिथे तो तरी काय करणार, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

काही दिवसांपासून या भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. सूर्यदर्शन क्वचितच घडत आहे. कापणी केलेल्या भाताला शेतातच मोड येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच अधिक पाऊस झाल्यास उभ्या पिकाच्या कणसाला मोड येतील, अशी भीती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील आदिवासी शेतकरी कर्ज घेऊन भातशेती करतो. दिवाळीपूर्वी पिकलेले अन्नधान्य साठवून रोजगारासाठी स्थलांतर करतो. तत्पूर्वी त्यातील थोडाफार वाटा विक्री करून कर्जमुक्त होण्याची त्याची धडपड असते; मात्र वर्षानुवर्षे बोजा असलेला सातबारा कोरा होण्याऐवजी पुन्हा बोजा कायम राहणार असून यंदादेखील ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

कर्जवसुलीचा ससेमिरा लागण्याची भीती
संपूर्ण डहाणू तालुक्‍यात भातशेती सोन्यासारखी पिकली आहे; मात्र दरम्यानच्या काळात पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. दिवाळीच्या पूर्वी कापणी करून जे काय धान्य येईल, त्या पैशातून दिवाळी साजरी करण्याची आशा लावून बसलेल्या शेतकऱ्याला सहकारी संस्था आणि बॅंकॉंचा कर्जवसुलीचा ससेमिरा लागण्याची भीती सतावू लागली आहे. त्यामुळे यंदा दिवाळी काळोखात जाणार की काय, या विवंचनेत शेतकऱ्यांची झोड उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer waiting to go away rain