रिक्षा चालवून ‘त्या’ हाकताहेत संसारगाडा!

सिद्धेश्‍वर डुकरे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

मुंबई - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिला खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करीत रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकत आहेत. स्वावलंबन योजनेअंतर्गत मिळालेल्या मदतीतून त्या परिस्थितीवर मात करीत आहेत.

मुंबई - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिला खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करीत रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकत आहेत. स्वावलंबन योजनेअंतर्गत मिळालेल्या मदतीतून त्या परिस्थितीवर मात करीत आहेत.

शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांत राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना राबविण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेतला. परिवहन विभागाने ही योजना राबवली. राज्यातील काही भागांतील टंचाई, गारपीट, अवकाळी पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा व कर्जफेडीचा तगादा या कारणांमुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांना या योजनेचे पाठबळ मिळत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या विधवांसाठी ऑटो रिक्षाकरिता १०० टक्‍के कर्जपुरवठा करण्यात येतो. यासाठी बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीने कर्जपुरवठ्याची जबाबदारी उचलली आहे. 

या महिलांना ऑटोरिक्षा खरेदी केल्यानंतर काही सवलती देण्यात आल्या आहेत. यामध्ये लायसन्स व बॅज यामध्ये सवलत देण्यात आली आहे. या योजनेमध्ये विधवा महिलांना देण्यात आलेल्या परवान्याचे पालकत्व संबंधित स्थानिक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे(आरटीओकडे) देण्यात आलेले आहे. विधवा लाभार्थी महिलांना मदत करणे. त्यांना प्रशिक्षण देणे, मार्गदर्शन करणे. कर्जाबाबत जामीनदार म्हणून विधवा महिलांना सहकार्य करण्याची जबाबदारी आरटीओवर सोपवण्यात आली आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांत मागील दोन वर्षांत परिवहन विभागाच्या या योजनेने काही कुटुंबांना मदतीचा आधार दिला आहे.

आत्महत्याग्रस्त जिल्हे 
वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशीम, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली 

१०६१ - आतापर्यंत ऑटो रिक्षासाठी आलेले एकूण अर्ज
७४१ - इरादापत्रे दिलेल्या महिलांच्या अर्जांची संख्या
३८२ - ऑटो रिक्षा खरेदी करून चालवत असलेल्या महिला

Web Title: Farmer Widow Women Rickshaw Driver Life Motivation