बोर्लीपंचतन : परतीच्‍या पावसामुळे ओलेचिंब झालेले भारे.
बोर्लीपंचतन : परतीच्‍या पावसामुळे ओलेचिंब झालेले भारे.

बळिराजाचे डोळे पाणावले

बोर्लीपंचतन (बातमीदार) : कोकणातील सर्वच भागात शनिवारपासून परतीच्या पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. श्रीवर्धन तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी शेतीची कापणी करून आलेले पीक आपल्या घरी आणण्यासाठी लगबग सुरू केली होती. काही नागरिकांनी तर पाऊस काही दिवसाने जाईल, या आशेवर दोन दिवसांपूर्वीच मोठ्या प्रमाणात कापणीला सुरुवातही केली. मात्र, हातातोडांशी आलेला घास या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातून जातो की काय? अशी भीती आता शेतकऱ्यांच्या मनात आली आहे.

लहरी वातावरणामुळे या वर्षी पावसाचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे. काही शेती तर १०-१२ दिवसांपूर्वीच तयार झाली होती; पण वातावरणात क्षणात होणारा बदल, ढंगाची चारही बाजूंनी होणारी गर्दी पाहून शेतकऱ्यांनी सोन्यासारखे धान्य पाऊस जाईल या उद्देशाने उभेच ठेवले होते. चार दिवसांपूर्वीच पाऊस गेला या अंदाजाने बहुतेक नागरिकांनी शेतीची कापणी जोरदार करायला सुरुवात केली. जी माणसे हाताला मिळतील ती घेऊन जागेवर मळणी काढू लागले. मात्र, दोन दिवसांपासून परतीच्या पावसामुळे खळ्यावर मळणी काढताना ओलाचिंब झालेला भात पाहिल्यावर शेतकरी हताश झाले आहेत.

काही शेतकरी तर अक्षरशः एकीकडे कापणी तर बाजूला प्लास्टिकच्या खळ्यावर ताबडतोब मळणी काढून जे धान्य मिळेल ते घरी आणण्यासाठी प्रयत्न करत होते. मळणकरी तर मळणी करताना थकून गेले होते. कारण अशी परिस्थिती कधी पाहिली नव्हती. शनिवारपासून तर ज्या शेतकऱ्यांनी शेती कापून ठेवली होती. त्यांची अवस्था एवढी वाईट झाली होती की, आता करायचे काय? हा प्रश्न समोर उभा होता. ओलेचिंब झालेला नजरेसमोरचा भात पाहून तर अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.

असा कधी पाऊस पाहिला नव्हता. आम्ही यापूर्वी उडवी रचून सवडीने मळणी काढायचो; पण यंदा निसर्ग कोपला आणि करपीवरच मळणी काढायची वेळ आली. झोडून आलेल्या भाताला लवकरच सुकवल नाही, तर वर्षाची मेहनत फुकट जाईल. पेंडे तर गेलेच फुकट आता गुरढोरांचा घास पण गेला.
- रामचंद्र गाणेकर, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com