वाशी बाजार समितीतील ई-नाम लिलाव कक्षाकडे शेतकऱ्यांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

सहा महिन्यांत या ई-नाम लिलाव कक्षात एकही व्यवहार झालेला नाही. १५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे सुविधागृह आता धूळखात पडले असून, या ठिकाणी असणारी कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळाही निरुपयोगी ठरली आहे.

मुंबई ः वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील पहिले ई-राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) लिलाव कक्ष जानेवारीमध्ये सुरू करण्यात आले. या ई-नाम लिलाव कक्षाकडे शेतकरी व ग्राहकांनीही पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. सहा महिन्यांत या ई-नाम लिलाव कक्षात एकही व्यवहार झालेला नाही. १५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे सुविधागृह आता धूळखात पडले असून, या ठिकाणी असणारी कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळाही निरुपयोगी ठरली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील पहिला ई-राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) सुरू करण्यात आला. याशिवाय बाजार समिती मुख्यालयाच्या इमारतीमध्ये ई-लिलावगृहासोबत कृषी माल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळाही सुरू केली होती. मात्र, सहा महिन्यांत येथे गुणवत्ता तपासणीसाठी धान्याचे नमुने कोणी पाठविलेच नाहीत. वास्तविक या प्रयोगशाळेचा वापर कोणी व कशासाठी करायचा, याची माहितीच व्यापाऱ्यांना नाही. त्यामुळे हा प्रयोगही पूर्णपणे फसल्याचे दिसून येत आहे.

लिलावगृह पडले ओस
बाजार समितीच्या ई-लिलावगृहामध्ये जवळपास आठ संगणक व एलईडी टीव्ही बसविण्यात आले आहे. या ठिकाणी पूर्णपणे ऑनलाइन शेतमालाची खरेदी व विक्री करता येईल, अशी सुविधा आहे; परंतु सहा महिन्यांत प्रत्यक्षात त्याचा वापर करण्यात आलेला नाही. कार्यालय धूळखात पडून असून बाजार समितीला भेट देण्यासाठी येणारे मंत्री व इतर शिष्टमंडळाला दाखविण्यापुरताच त्याचा उपयोग केला जातो.

ई-नाम लिलाव कक्षाचा वापर करण्यासाठी बाजार समितीमध्ये फलक लावण्यात आलेले आहेत; तर जनजागृतीदेखील करण्यात येईल. तरी ई-नाम व ई-प्रयोगशाळेचा योग्य वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- अशोक गाडे, सहसचिव, एपीएमसी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers lesson towards e-naam auction room in Vashi Bazar Samiti