'शेतकरी, कामगारांना देशोधडीला लावण्याचा डाव'; शेकापची केंद्र सरकारवर टीका

प्रमोद जाधव
Thursday, 26 November 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी, शोषित, शेतकरी, कामगारांना न्याय मिळवून दिला आहे;

अलिबाग: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी, शोषित, शेतकरी, कामगारांना न्याय मिळवून दिला आहे; परंतु याच गोरगरिबांना वेठीस धरण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. कृषी व कामगार कायदा मंजूर करून देशातील शेतकरी, कामगारांना देशोधडीला लावण्याचा डाव केंद्र सरकारने आखला आहे. शेतकरी व कामगारांच्या विरोधातील कायदा रद्द करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहे, असा निर्धार शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.  

हेही वाचा - नवी मुंबईत कोरोनाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार, प्रवीण दरेकरांचे गंभीर आरोप

कृषी व कामगार कायद्याबाबत तसेच अन्य मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी दुपारी एल्गार मोर्चा काढण्यात आला. या वेळी झालेल्या सभेत आमदार पाटील बोलत होते. कॉ. अशोक ढवळे, माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, जिल्ह्यातील तालुका चिटणीस, विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

केंद्र सरकारने शेतकरी, कामगार व सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या विरोधातील कायदे लागू करून त्यांना उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यात प्रकल्पांच्या नावांनी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेण्याचा डाव सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकरी यामुळे देशोधडीला लागणार आहे. कोरोनाचे संकट असताना, चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह, कामगार व जिल्ह्यातील जनता मोठ्या आर्थिक संकटात सापडली. याच काळात विद्युत वितरण कंपनीने भरमसाठ वीज बिल आकारून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले आहे. बिले भरण्यासाठी तगादा लावणाऱ्या कंपनीचा बंदोबस्त करायला पाहिजे, असेही पाटील म्हणाले. 

हेही वाचा - तलासरीत माकपाचा रास्तारोको! मुंबई-अहमदाबाद महामार्ग एक तास रोखून धरला

अलिबागमध्ये कडेकोट बंदोबस्त 
शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अलिबागमध्ये मोर्चा काढण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता शेतकरी भवन येथून मोर्चा निघाला. या मोर्चात अडीच हजारहून अधिक कार्यकर्ते सामील झाले होते. जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलसमोर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शेतकरी भवन, प्राजक्ता हॉटेल, जोगळेकर नाका, शिवाजी चौक, बालाजी नाका, मारुती नाका परिसरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

Farmers, workers to be evicted by central gov said jayant patil

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers, workers to be evicted by central gov said jayant patil