बसचालक मारहाणप्रकरणी पिता-पुत्राला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

उरण येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा कारला किरकोळ धक्का लागला. त्यामुळे कारमधील पिता-पुत्राने एसटी बसला थांबवून चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता.२) कळंबुसरे येथे घडली.

नवी मुंबई : उरण येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा कारला किरकोळ धक्का लागला. त्यामुळे कारमधील पिता-पुत्राने एसटी बसला थांबवून चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता.२) कळंबुसरे येथे घडली. या घटनेनंतर उरण पोलिसांनी पिता-पुत्रावर सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

तक्रारदार एसटी चालकाचे नाव गंगाराम गायकवाड असे असून, ते एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी ते पनवेल-आवरा या मार्गावर कार्यरत होते. सकाळी पनवेल येथून आवरे येथे गेल्यानंतर ते अकराच्या सुमारास एसटी घेऊन पनवेलच्या दिशेने जात होते. उरणमधील कोप्रोली येथे त्यांची एसटी बस आल्यानंतर  बाजूने जाणाऱ्या कारला किरकोळ धडक लागली. त्यामुळे कारचालक कृष्णा कान्हा म्हात्रे (४८) आणि त्यांचा मुलगा आकाश म्हात्रे  (२४) या दोघांनी या एसटीचा पाठलाग करून कळंबुसरे गावाजवळ ही बस थांबविली. त्यानंतर कृष्णा म्हात्रे व आकाश म्हात्रे या पिता-पुत्राने एसटीचालक गंगाराम गायकवाड यांना हाता-बुक्‍क्‍यांनी व चपलेने मारहाण केली. या घटनेनंतर चालक गंगाराम गायकवाड यांनी उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पिता-पुत्रावर सरकारी कामकाजात अडथळा आणून, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father, son arrested for beating bus driver