गोळीबारप्रकरणी पिता-पुत्राला अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई - वैयक्तिक वादातून माथाडी कामगारावर झालेल्या गोळीबाराचा छडा 12 तासांत लावण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी संशयित पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. 

मुंबई - वैयक्तिक वादातून माथाडी कामगारावर झालेल्या गोळीबाराचा छडा 12 तासांत लावण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी संशयित पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. 

गोळीबारात साहेबारेड्डी तिमय्या रामोशी (वय 37) जखमी झाला होता. या प्रकरणी सुखदेव रणदिवे (35) व त्याचा मुलगा संतोष याला अटक करण्यात आली. अनैतिक संबंधातून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. सुखदेव याचे एका महिलेशी आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते; मात्र नंतर त्या महिलेने रामोशी याच्याशी जवळीक केली. याचा राग आल्याने सुखदेवने गोळीबाराचा कट रचला. त्यानुसार सोमवारी रात्री 11 वाजता रामोशी दुचाकीने जात असताना चेंबूर पूर्वेतील पेप्सी कंपनीजवळ आरोपींनी त्याला गाठले. सुखदेवने दोन गोळ्या रामोशीच्या दिशेने झाडल्या. त्यातील एक गोळी पायाला लागून रामोशी जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. रामोशीला सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात त्याला हलवण्यात आले. याप्रकरणी आरसीएफ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही समांतर तपास केला. त्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. गुन्हे शाखा कक्ष-4 च्या पोलिसांनी माहुल गाव येथील म्हाडा कॉलनीत सापळा रचून आरोपींना अटक केली. आरोपींनी गोळीबारासाठी वापरलेले पिस्तूल कोठून खरेदी केले, याचाही तपास पोलिस करीत आहेत. 

Web Title: Father-son arrested for firing in mumbai