मिष्टान्न दुकानदार रडारवर 

मिष्टान्न दुकानदार रडारवर 

नवी मुंबई - अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने घणसोलीत शुक्रवारी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर जप्त केले. त्यानंतर या दोन्ही विभागांनी नवी मुंबईतील मिष्टान्न दुकानांवर करडी नजर ठेवली आहे. ऐन सणासुदीत गुजरातहून येणारा खवा, तूप यासारख्या पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांवरही लक्ष असणार आहे. तसेच भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेतही दिले आहेत.

नवरात्र, दिवाळी आणि दसरासारख्या उत्सवांत मिठाईला मोठी मागणी असते. त्यातही खवा आणि साजूक तुपात तयार केलेल्या मिठाईला अधिक मागणी असते; परंतु मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे मोठ्या नफ्याच्या लालसेने अनेक जण मिष्टान्नात भेसळ करतात. त्यांच्यावर एफडीए आणि महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे करडी नजर ठेवली जाणार आहे.

घणसोलीत या दोन्ही विभागांनी केलेल्या कारवाईत तब्बल ६०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले. त्यानंतर नवी मुंबईतील मिठाई तयार करणारे अनेक जण भेसळ करत असल्याचा अंदाज एफडीएचा आहे. 

घणसोलीतील दुकानातून ऐरोली, घणसोली, नेरूळ, वाशी, सीवूड्‌स, खारघर आणि पनवेल परिसरातील दूध डेअरींना पनीरचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे भेसळयुक्त पनीर खरेदी करणाऱ्या दूध डेअरींचीही झाडाझडती घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यांना पुरवठा होणाऱ्या सुट्या दुधाचा दर्जाही तपासला जाणार आहे, अशी माहिती एफडीएकडून देण्यात आली.

गुजरातमधून नवी मुंबई परिसरातील हजारो मिष्टान्न दुकाने आणि त्यांच्या कारखान्यांमध्ये खवा आणि तूप पुरवला जातो. त्याचा दर्जा तपासण्यात ग्राहक सुज्ञ नसल्यामुळे भेसळ करणाऱ्यांचे फावते; मात्र भेसळ अधिक प्रमाणात असल्यास विषबाधेसारखे प्रकार घडतात. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाचे नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील तीन परमंडळांमध्ये मोहीम तीव्र करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तळोज्यात कारवाई 
‘एफडीए’ने ५ ऑक्‍टोबरला तळोजा येथे केलेल्या कारवाईत तब्बल सहा लाख ७५ हजारांचे भेसळयुक्त वनस्पती तूप जप्त करण्यात आले. या कारवाईत विभागाने तब्बल १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक दिवसाआधी या विभागाच्या पथकाने भिवंडी येथे केलेल्या कारवाईत खव्याला पर्याय म्हणून बाजारात आलेली भेसळयुक्त बर्फी जप्त केली आहे. त्याची किंमत ८५ हजार आहे.

सणासुदीच्या काळात घणसोली येथे सापडलेले भेसळयुक्त पनीर नवी मुंबईतील बहुतांश ठिकाणच्या दूध डेअरी आणि मिष्टान्न येथे पुरवठा केला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. अशा भेसळयुक्त पदार्थांचा छडा लावण्यासाठी शोध मोहीम राबवली जाणार आहे.
- अरविंद कांडेलकर, अन्न सुरक्षा अधिकारी, एफडीए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com