एफडीएची प्रयोगशाळा अत्याधुनिक होणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

अन्न चाचणी प्रयोगशाळांच्या बळकटीकरणासाठी आवश्‍यक निधीच्या तरतुदीबाबत राज्याचे अन्नसुरक्षा आयुक्त आणि अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये गेल्या वर्षी चर्चा झाली होती.

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) राज्यातील अन्न चाचणी प्रयोगशाळेच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने 8 कोटी 5 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून अन्न चाचणीची तीन उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत. यामुळे एफडीएची राज्यातील प्रयोगशाळा अत्याधुनिक होणार आहे. 

अन्न चाचणी प्रयोगशाळांच्या बळकटीकरणासाठी आवश्‍यक निधीच्या तरतुदीबाबत राज्याचे अन्नसुरक्षा आयुक्त आणि अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये गेल्या वर्षी चर्चा झाली होती. या चर्चेत अन्न चाचणी प्रयोगशाळेत अद्ययावत उपकरणे खरेदी करण्यासाठी 8 कोटी 2 लाख आणि पायाभूत सुविधांसाठी 1 कोटी 8 लाख देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार 15 जूनला अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या दिल्ली कार्यालयात बैठक झाली. 

या बैठकीमध्ये "एफडीए'च्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी राज्यातील अन्न चाचणी प्रयोगशाळेच्या बळकटीकरणाच्या प्रस्तावाचे सादरीकरण केले. त्यानंतर प्राधिकरणाने राज्यातील प्रयोगशाळेचे बळकटीकरण करण्यासाठी सुमारे 8 कोटी 5 लाखांचा निधी मंजूर केला आहे. 8 कोटींमध्ये उपलब्ध पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि तीन अद्यावत अन्न चाचणी उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत. या उपकरणांचा उपयोग अन्न पदार्थांमधील धातूचे प्रमाण, किटकनाशके व जंतुनाशकांचे प्रमाण, मांसाहारातील जैविकरक्षक औषधांच्या प्रमाणाची चाचणी होणार आहे. 

Web Title: FDA's laboratory will be the latest