जलवाहिन्यांना कुंपणाचे कवच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

ठाण्यातील अतिक्रमणावर मुंबई पालिकेचा उपाय.

मुंबई ः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांलगत ठाणे आणि नाशिकच्या दुर्गम भागांत अतिक्रमणांचा विळखा बसल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे जलवाहिन्यांलगतची जागा संरक्षित करण्यासाठी कुंपण घालण्याचा निर्णय पालिकेच्या जलअभियंता विभागाने घेतला आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा ही धरणे ठाणे व नाशिक जिल्ह्यात आहेत. सुमारे १५० किलोमीटर अंतरावरून या धरणातील पाणी मुंबईत आणले जाते. यातून ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यासाठी दुर्गम भागांत मोठ्या जलवाहिन्या आणि जलबोगदे तयार करण्यात आले आहेत. तानसा, मोडकसागर ते मुलुंड, पिसे पांजरापूर ते मुलुंड अशा विविध व्यासाच्या जलवाहिन्या आणि भूमिगत जलबोगदे आहेत. ठाणे शहरासह खाडीतून या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.

भातसा धरणातून सुमारे ५० टक्के पाणीपुरवठा केला जातो. येवई ते मुलुंड, पिसे ते पांजरापूर, येवई-माजीवडे यादरम्यान जलवाहिन्या आहेत. येथे जलवाहिन्यांलगत मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे; मात्र काही महिन्यांत या जागेवर अतिक्रमणे वाढली आहेत. ठाण्याच्या ग्रामीण भागांत औद्योगिकीकरण झपाट्याने वाढल्याने जलवाहिन्यांलगतच्या मोकळ्या जागांवर तात्पुरते गॅरेज, कॅन्टीन, टपऱ्या उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करून या जागा कुंपण घालून संरक्षित केल्या जाणार आहेत. यासाठी पालिका ६७ लाखांचा खर्च करणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची लवकरच मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fencing to the water pipelines by mumbai municipalty