मुंबईच्या वाहतूक कोंडीत आणखी भर!

वाहतूक कोंडीत आणखी भर!
वाहतूक कोंडीत आणखी भर!

मुंबई : पश्‍चिम रेल्वेमार्गावरील ग्रॅन्ट रोड आणि चर्नी रोड स्थानकांदरम्यान असलेला ब्रिटिशकालीन फेरेरे पूल धोकादायक बनल्याने पाडण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीत अधिक भर पडण्याची शक्‍यता आहे.   

दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी फेरेरे पूल महत्त्वाचा आहे; मात्र हा पूल धोकादायक असल्याचे जाहीर झाल्यावर ऑक्‍टोबर महिन्यापासून त्यावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली. या पुलावरून जाणाऱ्या बेस्टच्या बस केनेडी पुलावर वळविण्यात आल्या. तरीही फेरेरे पुलावरून जड वाहनांची वाहतूक सुरू राहिल्याने या पुलावर बॅरियर बसविण्यात आले. केनेडी पुलावर सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. त्यातच आता फेरेरे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याने ही कोंडी अधिकच वाढणार आहे.

पूर्व-पश्‍चिम वाहतूक जोडणारे सॅंडहर्स्ट रोड आणि लोअर परळ येथील पूल तोडण्यात आल्याने मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होत आहे. यातच आता फेरेरे पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडण्याची शक्‍यता आहे. वसंतराव नाईक चौकातून येणारा ताडदेव मेन रोड, ग्रॅन्ट रोड स्थानकाकडे जाणारा नौशीर भरूचा मार्ग, फेरेरे पुलाकडे जाणारा मार्ग, केनेडी पूल, चौपाटी आणि ऑगस्ट क्रांती मैदानाच्या दिशेने जाणारा मार्ग असे सुमारे सहा रस्ते नाना चौकात एकत्र येतात. फेरेरे पुलावरील वाहतूक केनेडी पुलावर वळविण्यात आल्यामुळे त्या पुलावर कोंडी होणार आणि त्याचा परिणाम नाका चौकातील वाहतुकीवर होणार आहे. 

फेरेरे पुलाच्या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याने मुंबईकरांना, विशेषतः दक्षिण मुंबईतील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. या परिसरात अनेक शाळा, कॉलेज तसेच शासकीय कार्यालये आहेत.

पुनर्बांधणी रखडली
लोअर परळ येथील डेलासिस उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्याचबरोबर हॅंकॉक पुलावरही हातोडा पडल्याने परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. ग्रॅंट रोडचा फेरेरे पूल, मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल, दादरचा टिळक पूल, प्रभादेवीचा करोल पूल, महालक्ष्मीचा सध्याचा पूल आदी पाच पुलांची पुनर्बांधणी रखडलेली आहे. दुरुस्तीची कामे संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. शिवाय पश्‍चिम आणि मध्य रेल्वेच्या हद्दीतील ४४५ पुलांची पालिका, रेल्वे आणि आयआयटीच्या अधिकाऱ्यांद्वारे सुरक्षा तपासणी सुरू आहे. त्यात काही त्रुटी आढळल्यास भविष्यात आणखी काही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येण्याची शक्‍यता आहे.

आणखी पूल बंद होणार
दक्षिण मुंबईतील अनेक जीर्ण पूल वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. या पुलांची डागडुजी किंवा नव्याने पुनर्बांधणी करण्यास वेळ लागण्याची शक्‍यता आहे. त्यातच आता फेरेरे पूलही वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यानंतर दादर येथील टिळक पूल, शिव उड्डाणपूल, घाटकोपर-अंधेरी मार्गावरील लक्ष्मीबाग पूल, महालक्ष्मी पूल, कर्नाक बंदर पूल टप्प्याटप्प्याने वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी वाढण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com