पर्यावरणरक्षणाला म्हाडाचा हातभार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

5 इमारतींमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मिती; डम्पिंग ग्राऊंडवरील ताण होणार कमी

मुंबई : लोअर परळ येथील प्रकाश कॉटन आणि वडाळा येथील बॉम्बे डाईंग या गिरण्यांच्या जमिनींवरील म्हाडाच्या पाच इमारतींमध्ये ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर (सेंद्रिय कचरा प्रक्रिया) यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतींमधील ओल्या कचऱ्याचे रूपांतर खतात होईल. अशा प्रकारची यंत्रणा मोठ्या प्रमाणात बसवल्यास महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने सर्व सरकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा आदेश २०१६ मध्ये दिला होता. म्हाडाच्या सर्व नव्या इमारतींना काही दिवसांत ही योजना लागू होणार आहे. त्यानुसार पाच नव्या इमारतींमध्ये ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर बसवण्यात आले आहेत, अशी माहिती म्हाडाच्या वीज विभागाचे कार्यकारी अभियंता अमित भाषारकर यांनी दिली.

इमारत अथवा सोसायटीतील लोकसंख्येच्या निकषावर किती किलो क्षमतेची यंत्रणा बसवणार, याचा निर्णय घेण्यात येतो. त्यासाठी प्रत्येक घरात पाच व्यक्ती आणि माणशी  ३०० ग्रॅम अशी क्षमता ठरवण्यात आली आहे. प्रकाश कॉटन मिलच्या जमिनीवरील तीन इमारतींसाठी २३ लाख रुपये खर्च करून १३०० किलो क्षमतेचा ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर बसवण्यात आला आहे. बॉम्बे डाईंग मिलच्या जमिनीवरील दोन इमारतींसाठी ३८०० किलो क्षमतेचे दोन कन्व्हर्टर बसवण्यात आले आहेत. ओल्या कचऱ्यापासून निर्माण  होणाऱ्या खताची विक्री गृहसंस्थेला करता येणार आहे.

या यंत्रणेसाठी सोसायट्यांना वेगळी किंमत द्यावी लागणार नाही. घरांच्या किमतीतच ही रक्कम जोडण्यात आली आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकाश मिल येथील इमारतींमधील ३० टक्के घरांचा ताबा देण्यात आला असला, तरी अद्याप येथे खतनिर्मिती सुरू करण्यात आलेली नाही. 

ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर कुठे?

  •  लोअर परळ (प्रकाश कॉटन मिल) : तीन इमारती, १३०० किलो   क्षमता 
  •  वडाळा-नायगाव (बॉम्बे डाईंग) : दोन इमारती, ३६०० किलो क्षमता

येथेही बसवणार यंत्रणा 

  •  महावीरनगर (कांदिवली)
  •  अँटॉप हिल (वडाळा)
  •  पोदार मिल (ना. म. जोशी मार्ग)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fertilizer manufacturing from waste in buildings of mhada mumbai