वालधुनीवरील वडोल पुलाच्या कामासाठी जिंकू किंवा मरू ची लढाई

fight for bridge on vadol
fight for bridge on vadol

उल्हासनगर : गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळत ठेवलेल्या उल्हासनगरातील वालधुनी नदीवर वडोल गावाच्या पुलासाठी जिंकू किंवा मरू ची लढाई सुरू झाली आहे. अशोका फाऊंडेशनचे उपोषणकर्ते शिवाजी रगडे, नगरसेविका सविता तोरणे-रगडे यांनी नेहमीप्रमाणे लेखी आश्वासनाचे गाजर दाखवणाऱ्या पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाकलून लावले. त्यामुळे पुलाच्या कामात तात्काळ निकाल देण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे. 

शिवसेनेची सत्ता असताना मंजूर झालेल्या उल्हासनगरातील वालधुनी नदीवर वडोल गावाला जोडणाऱ्या पुलाच्या कामाला सत्तेत आलेल्या भाजपाने गती देण्याऐवजी कासवगतीने फज्जा उडवला आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून पाऊस नसल्याचा फायदा ठेकेदाराने उठवला नाही. त्यामुळे भाजपाच्या अच्छे दिनाचा समाचार घेतानाच अशोका फाऊडेशनचे अध्यक्ष शिवाजी रगडे, टीम ओमी कलानी गटातील नगरसेविका सविता तोरणे-रगडे हे समर्थकांसह आज पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. कायद्याने वागा लोकचळवळ चे राज असरोंडकर यांनी या उपोषणाला जाहीर पाठींबा देताना ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. 

शिवसेनेच्या महापौर अपेक्षा पाटील असताना रिपाइं आठवले गटाच्या उपमहापौर पंचशीला पवार यांनी केलेल्या मागणीनुसार तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी वालधुनी नदीवरील लहान पुलाच्या जागी मोठ्या पुलाच्या कामास मंजुरी दिली होती. कामास सुरवात देखील झाली होती. मात्र, नित्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी आल्यावर अहवाल येईपर्यंत सहा महिने काम थांबवण्यात आले होते. अहवाल सकारात्मक आल्यावर ठेकेदाराने कामाला गती दिली नाही. किंबहूना भाजपाने त्यासाठी दबावतंत्र वापरले नसल्याने पुलाचे काम कासवगतीने करण्यात ठेकेदाराने धन्यता मानली. पंचशीला पवार, रिपाइंचे प्रदेश सचिव नाना पवार पुलासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. मात्र, सत्ताधारी पुलाच्या कामाला गांभीर्याने घेत नसल्याने पुलाची अवस्था जैसे थे राहिली. 

2017 च्या पालिका निवडणुकीत अशोका फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी रगडे यांची बहीण सविता तोरणे-रगडे, टोनी सिरवानी हे निवडून आले. त्यांनी देखील पुलाच्या कामासाठी कंबर कसली. मात्र, तरीही पालिका आणि ठेकेदारा कडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी आठवड्यापूर्वी थेट आयुक्त गणेश पाटील यांनाच पुलाची अवस्था दाखवली. तेंव्हा 15 दिवसात या पुलाचे काम पूर्ण करण्याची तंबी आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ठेकेदाराला दिली. याला चार दिवस उलटून गेल्यावरही कामास सुरवात होत नसल्याने संतप्त झालेले शिवाजी रगडे यांनी आयुक्त गणेश पाटील यांच्या दालनातच अधिकारी व ठेकेदाराला खडे बोल सुनावले. 

शेवटी आयुक्तांनी मध्यस्थी करून ठेकेदाराला कामासाठी अतिरिक्त निधी देण्याची तयारी दर्शवली. 

याच पुलाच्या कामासाठी रिपाइंचे नाना पवार यांनी आयुक्तांची दोन दिवसांपूर्वी शिष्टमंडळ सोबत भेट घेतली तर मनसेने आयुक्तांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केले. एकंदरीत उल्हासनगरात पुलासाठी राजकारण पेटले.

पण मुदतीत काम करणे अशक्य असल्याने पालिकेने वालधुनी नदीवर येण्याजाण्यासाठी मातीचा पूल बनवला. यदाकदाचित जोराचा पाऊस आला तर हा पूल वाहून जाण्याची शक्यता आहे. याबाबत शिवाजी रगडे यांनी सत्ताधारी भाजपा, साई पक्षाचा आणि अच्छे दिनाचा समाचार घेताना मंगळवार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.तर कायद्याने वागा लोकचळवळचे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन लेखी आश्वासन देण्याचा प्रयत्न केला.मात्र काम सुरू करा,आश्वासनावर बोळवण करू नका.असे म्हणून अधिकाऱ्यांना हाकलून लावण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com