संपकरी डॉक्‍टरांविरोधात अवमान याचिका दाखल - उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

मुंबई - रुग्णांचे हाल करून संप पुकारणार नाही, अशी हमी न्यायालयाला देऊनही राज्यभरातील डॉक्‍टरांनी पुकारलेल्या सामूहिक रजा आंदोलनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी अवमान याचिका दाखल करण्यात आली. मंगळवारी (ता. 21) याचिकेवर सुनावणी होणार आहे.

मुंबई - रुग्णांचे हाल करून संप पुकारणार नाही, अशी हमी न्यायालयाला देऊनही राज्यभरातील डॉक्‍टरांनी पुकारलेल्या सामूहिक रजा आंदोलनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी अवमान याचिका दाखल करण्यात आली. मंगळवारी (ता. 21) याचिकेवर सुनावणी होणार आहे.

शीव आणि धुळे येथील रुग्णालयांत डॉक्‍टरांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाली. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्शियल डॉक्‍टर्सच्या (मार्ड) वतीने सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यामुळे राज्यभरातील रुग्णांचे हाल होत आहेत. मार्डच्या संपाविरोधात सामाजिक कार्यकर्ता अफाक माडविया यांनी यापूर्वी जनहित याचिका दाखल केली होती. त्या वेळी शांततापूर्ण आंदोलन करू; पण संप करणार नाही, अशी हमी मार्डच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली होती; तरीही सोमवारपासून मार्डच्या डॉक्‍टरांनी रजेच्या नावाखाली संप पुकारला. त्यामुळे माडविया यांनी वकील दत्ता माने यांच्यामार्फत मार्डविरोधात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली. न्या. रणजीत मोरे यांच्या खंडपीठापुढे याचिकेचा उल्लेख करण्यात आला. न्यायालयाला हमी देऊनही डॉक्‍टरांनी संप पुकारल्यामुळे रुग्णांचे हाल होत असून न्यायालयाचा अवमान झाला आहे, असे माने यांनी सांगितले.

मंगळवारी मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. डॉक्‍टरांनी पुकारलेला संप तातडीने मागे घ्यावा. राज्य सरकारने हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे. राज्य सरकारने डॉक्‍टरांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली होती, मात्र ती पूर्ण केली नाही, असे मार्डचे म्हणणे आहे.

Web Title: filed a contempt petition to doctor