आधारकार्ड तपशिलाशिवाय आयकर विवरण भरा ; न्यायालयाची परवानगी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्‍ट टॅक्‍सेस (सीबीडीटी) आणि प्राप्तिकर विभागाने आयटीआर फॉर्म आधार कार्ड तपशिलाशिवाय स्वीकारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी यात केली होती. 

मुंबई : आधार कार्डच्या तपशिलाशिवाय आयकर विवरण (आयटी रिटर्न्स) भरण्यास 25 जणांना उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली. न्या. एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठासमोर शिक्षक, वास्तुविशारद, पत्रकार आणि कार्यकर्ते अशा 25 जणांनी याचिका केली होती. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्‍ट टॅक्‍सेस (सीबीडीटी) आणि प्राप्तिकर विभागाने आयटीआर फॉर्म आधार कार्ड तपशिलाशिवाय स्वीकारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी यात केली होती. 

ऑनलाईन संकेतस्थळावर आयटी रिटर्न्स भरताना आधार कार्ड क्रमांक लिहिल्याशिवाय अर्ज स्वीकारत नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. सीबीडीटीने तयार केलेल्या संकेतस्थळात आधार कार्ड क्रमांक लिहिणे बंधनकारक आहे. तशी सुविधा यात केली आहे. त्यामुळे हा क्रमांक लिहिल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यावर 2 जुलैच्या आत या 25 जणांनी वैयक्तिकरीत्या अर्ज दाखल करण्याचे आदेश देत हे अर्ज विभागाने स्वीकारावेत, असे स्पष्ट केले. यासाठी खंडपीठाने दिल्ली आणि मद्रास उच्च न्यायालयाने याबाबतीत दिलेल्या निकालांचा आधार घेत ही परवानगी देत पुढील सुनावणी 17 जुलैपर्यंत तहकूब केली. 

Web Title: Fill income tax details without details of the Aadhaar card Court permission