अखेर महाविद्यालयीन निवडणुकीचे बिगूल वाजले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

या निवडणुकीचा निकाल याच दिवशी जाहीर होणार आहे. निकाल घोषित झाल्यानंतर महाविद्यालयांना पदाधिकाऱ्यांची माहिती विद्यापीठाकडे सादर करावी लागणार आहे.​

मुंबई : विद्यार्थी संघटना आणि महाविद्यालय विश्‍वाचे लक्ष लागून राहिलेल्या विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने महाविद्यालय आणि विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या निवडणुकीची आचारसंहिता 20 ऑगस्टपासून लागू होणार आहे, तर विविध पदांसाठी 30 ऑगस्टला मतदान होणार आहे. 

मुंबई विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेसाठी विभाग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांकरिता निवडणूक घेण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालय विद्यार्थी परिषदेसाठी वर्ग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांकरिता निवडणूक होईल. या निवडणुकीसाठी प्राचार्य/संचालक यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार चार तासांची मतदानाची वेळ जाहीर करावी, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

या निवडणुकीचा निकाल याच दिवशी जाहीर होणार आहे. निकाल घोषित झाल्यानंतर महाविद्यालयांना पदाधिकाऱ्यांची माहिती विद्यापीठाकडे सादर करावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally College Election Program Announced