अखेर ‘रिगल’ येथे बाळासाहेबांचा पुतळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मुंबई : मुंबईत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली होती. हा प्रस्ताव चार वर्षे लाल फितीत अडकला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच हा पुतळा उभारण्यास पुरातत्त्व विभागाने मंजुरी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीआधी हा पुतळा उभारण्याचे प्रयत्न असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. त्यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्‍टोबर २०१५ मध्ये गटनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी देऊन हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र पुरातत्त्व समितीकडे पाठवण्यात आला होता. 

पुरातत्त्व समितीने पुतळा उभारण्यास मंजुरी दिली आहे. मुंबई अर्बन आर्टस्‌ कमिशनकडून अद्याप होकार आलेला नाही. पुतळा उभारताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न असल्याने हा प्रस्ताव राज्य सरकारच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. 

नऊ फूट उंचीचा पुतळा
दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळील रिगल चित्रपटगृह, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेब ठाकरे यांचा नऊ फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे. याठिकाणी ११ फूट उंच चबुतरा बांधला जाणार आहे. बाळासाहेबांच्या ९४ व्या जयंतीदिनी, २३ जानेवारी २०२० रोजी पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन केले जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally the statue of Balasaheb at 'Regal'