अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्र्यांची कसोटी

प्रशांत बारसिंग
बुधवार, 11 जानेवारी 2017

राज्याच्या महसुलात घट; 18 महिन्यांत केवळ 40 टक्‍के वसुली

राज्याच्या महसुलात घट; 18 महिन्यांत केवळ 40 टक्‍के वसुली
मुंबई - अनेक कारणांमुळे गेल्या आठ महिन्यांत राज्याच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने यंदाचा अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कसोटी लागणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात गेल्या 18 महिन्यांत उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतातून केवळ 40 टक्‍के वसुली झाली असून, आता चार महिन्यांत 60 टक्‍के वसुलीचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे.

एक एप्रिलपासून आर्थिक वर्ष सुरू होत असल्याने त्या वर्षातील एकूण अपेक्षित उत्पन्नाच्या आधारे राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येतो.

गेल्या वर्षीच्या उत्पन्नात अंदाजे 11 टक्‍के वाढ ग्रहीत धरून उत्पन्नाचा अंदाज बांधला जातो. विक्रीकर, उत्पादनशुल्क, वाहन विक्रीवरील कर; तसेच मुद्रांक शुल्क या माध्यमातून राज्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडते. या उत्पन्नाच्या जोरावर राज्याचा अर्थंसंकल्प मांडला जातो. तसेच राज्याच्या प्रगतीचे ठोकताळे मांडले जातात. महसुलाचे गणित बिघडले तर तुटीचा अर्थसंकल्प मांडण्याची नामुष्की सरकारवर ओढवते. परिणामी अनेक विकासकामांवर याचा विपरित परिणाम होतो.

या पार्श्वभूमीवर राज्याच्या वसुली यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असतात. मात्र, आर्थिक चणचण आणि अनेक कारणांमुळे राज्याच्या उत्पन्नात घट झाल्याचे वित्त विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
यंदाचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2016 पासून सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर 2016 अखेरपर्यंत म्हणजेच गेल्या आठ महिन्यांत केवळ 40 टक्‍के महसूल जमा झाला आहे. डिसेंबर महिन्यातील आकडेवारी जानेवारीअखेरपर्यंत वित्त विभागाला मिळणार आहे. म्हणजेच आठ महिन्यांत साधारणतः 65 ते 70 टक्‍के महसूल जमा होणे अपेक्षित होते. मात्र, त्यात मोठी घट झाल्याचे दिसून येते. आता चार महिन्यांत 60 टक्‍के वसुली करणे सरकारी यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. राज्य सरकारने कितीही जोर लावला तरी आणखी जास्तीत जास्त 30 टक्‍केच वसुली होऊ शकते, म्हणजेच उर्वरित 30 टक्‍क्‍यांवर पाणी पडण्याची शक्‍यता आहे. यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट होण्याची भीती वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. त्यामुळे राज्याचा पुढील अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्र्यांची कसोटी लागणार असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

राज्याच्या उत्पन्नाचा लेखाजोखा (रुपये कोटींमध्ये)
उत्पन्नाचा स्रोत वर्षभरात अपेक्षित उत्पन्न आठ महिन्यांतील वसुली

उत्पादन शुल्क 15 हजार 343 7 हजार 517
विक्रीकर 81 हजार 437 54 हजार 165
स्टॅंप व मुद्रांक शुल्क 23 हजार 547 13 हजार 152
वाहन विक्री 6 हजार 750 4 हजार 359
प्रवासी व मालवाहतूक 1 हजार 275 237
वीज व उपकरणे 7 हजार 912 1 हजार 745
सेवाकर 5 हजार 147 2 हजार 574
अन्य कर 2 हजार 236 1 हजार 447

Web Title: Finance Minister also set the budget for the Test