रसिकलाल ज्वेलर्सप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची शोधमोहीम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सचे संचालक जयेश शाह यांचे घर व दुकानात गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने शोधमोहीम राबवली.

मुंबई : रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सचे संचालक जयेश शाह यांचे घर व दुकानात गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने शोधमोहीम राबवली. याप्रकरणी आतापर्यंत 40 गुंतवणूकदार पुढे आले असून त्यांच्या फसवणुकीची रक्कम साडेतीन कोटींवर पोहोचली आहे. भविष्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

हप्ते भरा आणि बारावा हप्ता आम्ही भरू व त्याचे सोने ग्राहकांना मिळेल, या आशेने अनेकांनी गुंतवणूक केली. त्यामुळे या योजनेअंतर्गत या ज्वेलर्सने अनेक ग्राहक जोडले होते. अनेक ग्राहकांकडून मुदत ठेवीही घेतल्या होत्या. तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला जादा व्याजदर मिळेल, असे आश्‍वासन या ज्वेलर्सने गुंतवणूकदारांना दिल्याने शेकडो ठेवीदारांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक या ज्वेलर्सकडे केली होती.

घाटकोपरमधील एका गुंतवणूकदाराने रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सने आपली 60 लाख 98 हजारांना फसवणूक केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. अशाप्रकारच्या तक्रारी अनेकांनी दाखल केल्याचे उघड झाले आहे. शाह यांचे दुकान 28 ऑक्‍टोबरपासून बंद असल्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यातून गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्यामुळे तक्रारी करण्यास सुरूवात झाली आहे. याप्रकरणी स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी नुकतीच पोलिस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली होती.

त्यानंतर सोमवारी हे प्रकरण गुन्हे शाखेला पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आले होता. याप्रकरणी लवकरच महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायदा (एमपीआयडी) अंतर्गत विविध कलम वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकरणात गुंतवणूकदारांचे अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.  

 web title : Financial crime branch search campaign for Rasiklal Jewelers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Financial crime branch search campaign for Rasiklal Jewelers