बंद पुलांचा बेस्टला फटका 

बंद पुलांचा बेस्टला फटका 

मुंबई - मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिकेने शहर आणि उपनगरांतील काही धोकादायक पूल बंद केले आहेत. परिणामी वाहनचालकांचे हाल होत आहेत; पण त्याचा आर्थिक फटका मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टलाही बसत आहे. पूलबंदीमुळे दररोजच्या सुमारे 60 हजारांच्या महसुलावर त्यांना पाणी सोडावे लागत आहे. 

बेस्ट समितीचे सदस्य भाजपचे सुनील गणाचार्य यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे उत्पन्नाबाबतच्या गंभीर प्रश्‍नाकडे सदस्यांचे लक्ष वेधले. सीएसएमटीजवळील हिमालय पूल कोसळून सात जणांचा मृत्यू व सुमारे 33 जण जखमी झाल्यानंतर महापालिकेला खडबडून जाग आली आणि पुलांचे तातडीने स्ट्रक्‍चरल ऑडिट सुरू झाले. त्यामध्ये मुंबईतील सुमारे 29 पूल धोकादायक स्थितीत आढळून आले. त्यापैकी पालिकेने आठ पूल बंद केले. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होत आहे; मात्र बेस्टलाही मोठा फटका बसत असल्याकडे गणाचार्य यांनी सदस्यांचे लक्ष वेधले. 

वाहतूक कोंडीमुळे बेस्ट बस फारच धीम्या गतीने चालत असून प्रवासी संख्या रोडावली आहे. त्यातच धोकादायक पूल पाडल्यामुळे किंवा वाहतुकीस बंद केल्यामुळे बेस्ट बसना मोठा वळसा घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या घटली आहे. शिवाय वेळ आणि इंधन खर्चही वाढला आहे. त्यामुळे बेस्टला दररोजचा सुमारे 60 हजारांचा तोटा सहन करावा लागत आहे. 

बेस्ट आर्थिक तोट्यात आहे. कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत. सेवानिवृत्त कामगार बेस्टकडून येणे असलेल्या थकीत रकमेसाठी दररोज खेटे घालत आहेत. अशातच पूलबंदीचा फटका बेस्टला सहन करावा लागत आहे. 

तोटा वसूल करा 
पूलबंदीचा किंवा नागरी कामांचा बेस्टला आर्थिक फटका बसत असेल तर संबंधितांकडून तो तोटा वसूल करा, अशी मागणी बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केली. कोणत्याही कारणास्तव वाहतुकीच्या मार्गात बदल करताना महापालिका आणि मेट्रो प्राधिकरण बेस्टच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार करीत नाही. तो तोटा त्यांकडून वसूल करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com