
छोट्या उद्योजकांसाठी ICICI ची डिजिटल यंत्रणा; बिगर खातेदारांनाही लाभ
मुंबई : लघू, मध्यम व सूक्षम उद्योगांना सर्व आर्थिक सेवा एकत्र मिळाव्यात यासाठी सर्वंकष डिजिटल यंत्रणा तयार केल्याची माहिती आयसीआयसीआय बँकेतर्फे आज येथे देण्यात आली. विशेष म्हणजे जे उद्योजक बँकेचे खातेदार नसतील त्यांनाही या यंत्रणेचा फायदा मिळेल. बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची यांनी आज येथे ही माहिती पत्रकारांना दिली. यामुळे सध्याच्या खातेदारांना तर विविध बँकिंग सेवांचा लाभ मिळेलच. पण इतर बँकांचे खातेदार असलेल्या छोट्या उद्योजकांनाही आयसीआयसीआय बँकेच्या विविध सेवांचा लाभ मिळेल.
अशा प्रकारची ही पहिलीच सेवा असल्याचे सांगितले जाते. बँकेच्या लघुद्योग-इकॉमर्स विभागाचे प्रमुख पंकज गाडगीळ यांनी या यंत्रणेचे प्रेझेंटेशन केले. बँकेच्या इन्स्टाबिझ अॅपच्या नव्या आवृत्ती मार्फत या सेवांचा लाभ घेता येईल. त्यांना ओडी किंवा करंट अकाऊंट उघडणे या बाबी या यंत्रणेमार्फत घरबसल्या करता येतील. तसेच एकाच यंत्रणेत सर्व सोयी मिळाल्या की त्यामुळे त्यांचा वाचलेला वेळ ते आपल्या व्यवसायाच्या विकासासाठी देऊ शकतील. छोटे व सूक्ष्म उद्योजक हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने त्यांना ईज ऑफ डुईंग बिझनेस चा लाभ होऊन त्यांचा विकासात हातभार लागावा, यासाठी हा प्रयत्न आहे, असेही बागची यांनी सांगितले.