मुंबईतील श्‍वानप्रेमींनो, सावधान! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मुंबई : पाळीव प्राण्यांना रस्त्यांवर फिरवणाऱ्यांकडे "पूप स्कूपर' (विष्ठा उचलण्याचे साधन) नसल्यास 500 रुपये दंड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही मोहीम पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येईल. 

मुंबई : पाळीव प्राण्यांना रस्त्यांवर फिरवणाऱ्यांकडे "पूप स्कूपर' (विष्ठा उचलण्याचे साधन) नसल्यास 500 रुपये दंड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही मोहीम पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येईल. 

मलबार हिल, गिरगाव परिसरात काही महिन्यांपूर्वी पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर केलेली घाण त्यांच्या मालकांकडून साफ करून घेण्यात आली होती. त्या वेळी काही जणांकडून दंडही वसूल करण्यात आला होता. ही मोहीम आता संपूर्ण शहरात राबवण्यात येणार आहे. या आठवड्यात पाळीव प्राण्यांच्या मालकांचे स्वच्छता पालनाबाबत प्रबोधन करण्यात येईल. त्यांना "पूप स्कूपर'बाबत माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यापासून "पूप स्कूपर' नसलेल्यांकडून दंड वसूल करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. 

महापालिका प्रशासनाच्या मासिक आढावा बैठकीत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्यावर पाळीव प्राणी विष्ठा टाकत असल्याने शहर विद्रूप होते आणि पावसाळ्यात लेप्टोसारखे आजार पसरण्याचाही धोका असतो. सुमारे 104 प्राणिजन्य आजारांचा धोका असल्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. 

पाळीव श्‍वानांची गणना 
राज्य सरकारच्या निर्देशांनुसार मुंबई महापालिका शहरातील पाळीव श्‍वानांची गणना करणार आहे. 2012 मधील पशुगणनेनुसार शहरात 40 हजार 500 पाळीव श्‍वान आहेत. ही संख्या कमी असल्याचा महापालिकेचा अंदाज आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांच्या गणनेत पाळीव श्‍वानांची माहिती मिळवण्यात येणार आहे. या श्‍वानांच्या मालकांना महापालिकेकडून परवान घेणे बंधनकारक करण्यात येईल. परवाने न घेतल्यास कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

पालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन परवाना 
- पहिल्या वेळी नोंदणी : 105 रुपये 
- दर वर्षी नूतनीकरण : 100 रुपये 
- परवाना मिळण्याचा कालावधी : 3 दिवस 
- रेबिजसारख्या लसीचे प्रमाणपत्र बंधनकारक 

Web Title: Fine to the dog owner if there is no poop scooper