प्रदीप शर्मा यांचा प्रचार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

तुळिंज पोलिसांत गुन्हा दाखल

नालासोपारा : शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रदीप शर्मा यांचा फेसबुकच्या माध्यमातून प्रचार करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र विचारे यांच्यावर शासकीय सेवेत असताना एखाद्या उमेदवाराचा प्रचार करून, मतदारावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोकप्रतिनिधी अधिनियम १२९ (२) सी कलमान्वये तुळिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई स्थानिक गुन्हे शाखेतील कार्यरत पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र विचारे यांची निवडणुकीपूर्वी नियमित बदली प्रक्रियेनुसार पालघरच्या कल्याण शाखेत बदली करण्यात आली होती. पण तिथे ते हजर न होता वैद्यकीय रजेवर गेले होते. १५ ऑक्‍टोबर रोजी प्रदीप शर्मा यांनी दुचाकी रॅली काढून विरार पूर्व येथील फुलपाडा परिसरात शेवटी एक प्रचारसभा घेतली होती. या सभेला प्रदीप शर्मा यांच्या प्रचारासाठी भाजपचे विद्यमान खासदार सत्यपाल सिंह नालासोपाऱ्यात आले होते. त्यावेळी सत्यपाल सिंह यांची विचारे यांनी भेट घेऊन त्या भेटीचा फोटो फेसबुकवर प्रसिद्ध केला होता.

तसेच प्रदीप शर्मा यांच्या कार्याची माहितीही विचारे यांनी पोस्ट केली होती. त्यामुळे शासकीय सेवेत असताना राजकीय उमेदवार, प्रचारक यांच्यासोबत फोटो काढून, त्यांच्या माहितीसह ती पोस्ट समाजमाध्यमावर प्रसिद्ध करून, मतदारांवर प्रभाव टाकत असल्याच्या कारणावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी पालवे यांनी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र विचारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR against a sub-inspector for campaigning