'आरे'च्या डोंगरात अग्नितांडव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मुंबई : गोरेगाव येथील आरे वसाहतीच्या परिसरातील डोंगरावर सोमवारी (ता. 3) सायंकाळी वणवा भडकला. चित्रपट नगरीजवळील हबाळी पाडा येथे ठिणगी पडून एक हेक्‍टरवरील जंगल खाक झाले. लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आग पसरण्याची भीती असल्याने त्या परिसरातील झाडे कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, थंडीच्या दिवसात वणवा लागण्याची शक्‍यता कमी असल्याने या आगीबाबत संशय व्यक्त केला जात आहे. 

आग लागलेल्या परिसरात दुर्मिळ वृक्षसंपदा असून बिबटे व अन्य वन्यप्राण्यांचा वावर असतो. हबाळी पाडा येथे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ठिणगी पडली. त्यानंतर झाडांची सुकलेली पाने आणि वाळलेल्या गवतामुळे आग वेगाने पसरली. या अग्निकांडात एक हेक्‍टरहून अधिक भागावरील झाडे जळून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील आदिवासी पाडे रिकामे करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. 

जंगलात लागलेल्या आगीपर्यंत अग्निशमन दलाचे बंब पोहोचू शकत नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या. बंबगाड्या रस्त्यावर उभ्या करून पुढे पाईप जोडून आगीवर पाणी मारले जात होते. झाडांच्या ओल्या फांद्यांनी झोडपून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. या परिसरालगतच्या राष्ट्रीय उद्यानातही आग पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे गरज भासल्यास तेथील वृक्ष कापून आगीला अडवण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे. 

निवासी भाग सुरक्षित 
आरे वसाहतीच्या परिसरातून ही आग रात्री उशिरा दिंडोशीतील म्हाडा वसाहत आणि अन्य निवासी भागाच्या दिशेने पसरू लागली. त्यामुळे अग्निशमन दलाची यंत्रणा त्या भागाकडे वळवण्यात आली. ही आग काही वेळाने नियंत्रणात आणण्यात आली. 

भारतात कधीच नैसर्गिक वणवे लागत नाहीत. मुंबईतील सध्याचे ढगाळ वातावरण वणव्यासाठी पोषक नाही. आरे वसाहतीच्या परिसराला लागलेली आग मानवनिर्मित आहे. 
- आनंद पेंढारकर, पर्यावरणतज्ज्ञ 

अग्निशमन दलाची यंत्रणा 
10 : बंब 
7 : जेट 
3 : क्विक रिस्पॉन्स वाहने 

Web Title: Fire at Aare colony loss of 4 km forest