वांद्र्यातील एमटीएनएलच्या इमारतीला आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

वांद्रे पश्चिम मधील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. तिसऱ्या मजल्यावर लागलेली ही आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर ही पोहोचल्याने इमारतीमधील लोकांनी टेरेसवर आसरा घेतला आहे.

मुंबई : वांद्रे पश्चिम मधील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. तिसऱ्या मजल्यावर लागलेली ही आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर ही पोहोचल्याने इमारतीमधील लोकांनी टेरेसवर आसरा घेतला आहे.

दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान ही आग लागली. तळमजला अधिक नऊ मजले असणाऱ्या या इमारतीत एमटीएनएलचं कार्यालय आहे. तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात सर्वप्रथम आग लागण्याचं सांगितलं जातंय. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र आग पसरत चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे.

इमारतीची उंची अधिक असल्याने अग्निशमन दलाने ब्रांटो लिफ्टच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, आग तीन मजल्यांवर पसरल्याने इमारतीच्या लिफ्ट वापरासाठी बंद करण्यात आल्या आहेत. इमारतीच्या सहा, सात, आठ, नवव्या मजल्यावर जे लोकं अडकली आहेत त्या 80 ते 100 लोकांना इमारतीच्या टेरेसवर सुरक्षित जागी थांबण्यास सांगण्यात आले आहे. अग्निशमन दलाने बाजूच्या इमारतीमधून बचावकार्य सुरू केले आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट दिसत आहेत. मुंबई : वांद्रे एमटीएनएल आग...टेरेसवर अडकलेल्या 15 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire at Bandra MTNL Building in mumbai

टॅग्स