परळच्या क्रिस्टल टॉवरला आग; चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

आगीत अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात अग्मिशमनच्या जवानांना यश आले आहे. तर 16 जखमींना केईएममध्ये उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. 

मुंबई : मुंबईतील परळ पूर्वमधील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. टॉवरच्या बाराव्या मजल्याला आग लागल्याने अनेक लोक अडकून पडली होती. मृतांपैकी दोघाजणांचा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरून मृत्यू झाला, यात एका वृद्ध महिलेचा व एका पुरूषाचा समावेश आहे. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रूग्णालयात दाखल केले आहे. आज (ता. 22) सकाळी साडेआठच्या दरम्यान ही आग लागली. 

दरम्यान, अग्निशमन दलाच्या दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आले आहे. आगीत अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात अग्मिशमनच्या जवानांना यश आले आहे. तर 16 जखमींना केईएममध्ये उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. 

आगीत बाराव्या मजल्याचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमनच्या 20 गाड्या आणि 6 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. तर अग्निशमन दलाने इमारतीचे पाणी व वीज कापण्याच्या सूचना दिल्या आहेत.  

आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

 

Web Title: fire at crystal tower in paral mumbai 4 dies