अग्निशमन सप्ताहात प्रात्यक्षिकांचा थरार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

मुंबई - अग्निसुरक्षा सप्ताहात अग्निशमन दलाचे अत्याधुनिक फायर फायटिंगचे इंजिन व अग्निशमन उपकरणे यांच्या प्रात्यक्षिकांचा थरार मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. अग्निशमन सुरक्षा सप्ताहाला 14 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या कालावधीत ही प्रात्यक्षिके होतील. 

मुंबई - अग्निसुरक्षा सप्ताहात अग्निशमन दलाचे अत्याधुनिक फायर फायटिंगचे इंजिन व अग्निशमन उपकरणे यांच्या प्रात्यक्षिकांचा थरार मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. अग्निशमन सुरक्षा सप्ताहाला 14 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या कालावधीत ही प्रात्यक्षिके होतील. 

कोणत्याही वयोगटातील व्यक्ती "फायर फायटिंग'साठी योगदान देऊ शकते म्हणूनच प्रत्येकाला या सप्ताहात सहभागी करून घेण्याचा उद्देश असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. यात शाळकरी मुलांना सहभागी करून घेतले असल्याचेही ते म्हणाले. स्थानिक पातळीवरील स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेणार असून नगरसेवक, राजकीय नेतेमंडळी यांच्यामार्फत अधिकाधिक लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवला जाणार आहे. या प्रात्यक्षिकांतून अग्निसुरक्षेबाबत जागृती केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

मुंबईत तीन ठिकाणी ही प्रात्यक्षिके होणार आहेत. त्यामध्ये पूर्व उपनगरामध्ये मानखुर्द, पश्‍चिम उपनगरामध्ये मालाड आणि दक्षिण मुंबईत वडाळा आदी ठिकाणे निवडली आहेत. नागरिकांना या ठिकाणच्या अग्निशमन केंद्रात ही प्रात्यक्षिके पाहता येतील. मुंबईतील सहा प्रादेशिक कमांड सेंटरमध्येही अशी प्रात्यक्षिके होणार आहेत. अग्निशमन दलातील उंचीच्या शिड्या असणारी फायर इंजिन या प्रात्यक्षिकांच्या निमित्ताने पाहायला मिळतील. अग्निशमन दलामार्फत केले जाणारे बचावकार्यही या दरम्यान पाहायला मिळेल. आपल्या परिसरात एखादी घटना घडल्यानंतर आपत्कालीन स्थितीत कशा पद्धतीने नागरिक प्राथमिक प्रतिबंधाच्या गोष्टी करू शकतात यासारखा अनुभव प्रात्यक्षिकातून मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

Web Title: Fire Fighting Week MUMBAI