उल्हासनगरात फर्निचर दुकानाला आग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

या आगीत जवळपास 50 लाखांहून अधिक रुपयांचे फर्निचर व इतर सामान जळून खाक झाले.

उल्हासनगर : रिमझिम पाऊस सुरू असतानाच उल्हासनगरातील फर्निचर मार्केटमधील एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. या आगीत जवळपास 50 लाखांहून अधिक रुपयांचे फर्निचर व इतर सामान जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच उल्हासनगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन चार तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. 

उल्हासनगरातल्या फर्निचर मार्केट परिसरातील टपाल कार्यालयाजवळ "गोल्डी' नावाचे फर्निचरचे होलसेल व रिटेलचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी रिमझिम पाऊस सुरू असतानाच या फर्निचर दुकानाच्या दुसऱ्या माळ्यावर आग लागली. या आगीत विविध प्रकाराचे तयार करून ठेवलेले फर्निचर व इतर साहित्य जळाले. या आगीमुळे त्या परिसरात धुराचे लोट पसरले होते.

आगीची माहिती अग्निशमन अधिकारी भास्कर मिरपगार यांना मिळताच त्यांनी उपस्थानक अधिकारी पंकज पवार, एस. टी. बोंबे, फायरमन राजेंद्र डमाळे, प्रवीण फुंदे, किरण मोरे आदी पथकासह त्या ठिकाणी धाव घेतली. ही आग पसरत गेल्याने जवळपासच्या दुकानांना धोका निर्माण झाला होता. अग्निशमन दलाचे चार बंब व 10 पाण्याच्या टॅंकरद्वारे चार तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्‍यात आणली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  

web title : Fire up furniture store in Ulhasnagar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire up furniture store in Ulhasnagar