कांदिवलीत 'अनमोल टॉईज' आगीत भस्मसात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

कांदिवली - कांदिवली पश्‍चिम येथील "अनमोल टॉईज' या खेळणी बनवण्याच्या कारखान्याच्या गोडाऊनला बुधवारी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल दोन तास अथक परिश्रमाने ही आग आटोक्‍यात आणली. दुपारी जेवणाच्या सुट्टीदरम्यान ही आग लागल्याने जीवितहानी झाली नसली, तरी दिवाळीसाठी बनवलेली कोट्यवधी रुपयांची खेळणी खाक झाली.

कांदिवली पश्‍चिमेला असलेल्या "चारकोप को-ऑपरेटिव्ह इंड्रस्ट्रियल इस्टेट'मध्ये अनेक लहान-मोठे उद्योग आहेत. या इंड्रस्ट्रियल इस्टेटमध्ये अनमोल टॉईज हा खेळणी बनविण्याचा दुमजली कारखाना आहे. तळमजल्यावर कार्यालय, उत्पादन व पॅकिंग केले जाते व पहिल्या मजल्यावर माल ठेवण्यात येतो. बुधवारी दुपारी काम संपवून 30 ते 35 कामगार जेवायला बसले असता त्यांना अचानक उग्र वास आणि धुराचे लोट दिसू लागले. त्यांनी तातडीने सुपरवायझरला सांगत अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत कामगारांनी शक्‍य तेवढी खेळणी बाहेर काढली.

पाच फायर इंजिन, पाच टॅंकर, एक ऍम्ब्युलन्स आणि अंधेरी येथून श्वसन उपकरणाची गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली. विभागीय अग्निशमन अधिकारी दीपक घोषसह 50 जवानांनी अथक प्रयत्न करून दोन तासांत आग आटोक्‍यात आणली. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस, वाहतूक पोलिस यांनीही घटनास्थळी धाव घेतली. कारखान्यात दिवाळीनिमित्त उत्पादनासह कारखान्याची दुरुस्ती आणि रंगरंगोटीचे कामही सुरू होते. कारखान्यामध्ये वेल्डिंगचे कामही सुरू होते. कदाचित वेल्डिंगच्या कामामुळे आग लागली असण्याची शक्‍यता कर्मचाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड, आमदार योगेश सागर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद पवार, पोलिस निरीक्षक गोकुळसिंग पाटील, विजय कांदळगावकर, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान राठोड, नगरसेवक श्रीकांत कवठणकर व महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी होते. आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा करताना गोडाऊनमधील बॉक्‍समुळे धूर फेकला जात होता. त्यामुळे अडचणी आल्या; मात्र दोन तासांच आग नियंत्रणात आली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे दीपक घोष यांनी सांगितले.

Web Title: fire in kandivali