ठाण्यात पुन्हा जळीतकांड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

चार रिक्षा, चार दुचाकी खाक

चार रिक्षा, चार दुचाकी खाक
ठाणे - वडिलांच्या नावावर असलेली दुचाकी मागितल्यानंतर काकाने ती देण्यास नकार दिल्याने एकाने ती दुचाकी पेटवली. या घटनेत दुचाकी शेजारी उभ्या असलेल्या चार रिक्षा आणि अन्य तीन दुचाकी खाक झाल्या. वागळे इस्टेट परिसरात सोमवारी पहाटे ही घडना घडली. श्रीनगर पोलिसांनी याप्रकरणी अजय बुंबक याला अटक केली. ठाण्यात दोन महिन्यांत वाहने जाळण्याच्या सहा घटना घडल्या आहेत.

वागळे इस्टेटमधील साठेनगर भागात अजय राहतो. वडील रमेश यांनी दीड वर्षापूर्वी त्यांचा भाऊ सुभाष यांच्या सांगण्यावरून कर्ज काढून दुचाकी खरेदी केली होती. कर्जाचे काही हप्ते अजयच्या वडिलांनी भरले, तर काही हप्ते सुभाष भरत होते. दुचाकी मात्र सुभाष यांच्याकडेच होती. रविवारी मध्यरात्री रमेश हे सुभाष यांच्या घरी गेले होते. त्या वेळी सुभाष यांनी त्यांना घरी जाण्याची विनंती केली. वडिलांना घराबाहेर काढल्याचा समज झाल्याने अजय आणि सुभाष यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर अजयने दुचाकी मागितली; मात्र हप्ते मी भरत असल्याने दुचाकी मिळणार नाही, असे सुभाष यांनी त्याला खडसावले.

सुभाष यांच्या घराजवळ दुचाकी उभी करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे ते चुलत भावाचा मुलगा चालवत असलेल्या टीएमटी बस डेपोजवळील बेकायदा वाहनतळावर दुचाकी उभी करतात. सोमवारी पहाटे 3 वाजता अजय तेथे पोहचला आणि त्याने पेट्रोलचा पाईप काढून दुचाकीला आग लावली. यात शेजारी उभ्या असलेल्या इतर तीन दुचाकी आणि चार रिक्षाही खाक झाल्या. पोलिसांनी चौकशीनंतर अजयला अटक केली.

Web Title: Fire Rickshaw Two Wheeler Loss Crime