ताडदेव परिवहन कार्यालयात आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मुंबई - ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) ऑनलाइन शिकाऊ परवाना कार्यालयाला रविवारी पहाटे आग लागली. या आगीत कार्यालयातील संगणक आणि परवाना अर्ज जळाले आहेत. अडीच तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले. आगीमागचे कारण समजू शकलेले नाही.

ताडदेव येथे प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय आहे. सकाळी 5.15 वाजता शिकाऊ परवाना कार्यालयातून धूर येताना सुरक्षारक्षकाने पाहिले. याबाबत माहिती मिळताच ताडदेव पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सुर्वेही घटनास्थळी हजर होते. कार्यालयाचे छप्पर लाकडी असल्याने आगीने पेट घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी वाहतूक अन्य मार्गाने वळवली. सोबतच आठ फायर इंजिन, आठ जेट्टींसह अडीच तासांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले.

नागरिकांच्या सोईसाठी ऑनलाइन वाहन परवाना कार्यालय दुसऱ्या बॅरेकमध्ये सुरू करण्यात आले आहे, असे ताडदेवचे परिवहन अधिकारी सुभाष पेडामकर यांनी सांगितले.

पुढील अनर्थ टळला!
आरटीओ कार्यालयाच्या मागे सीएनजी पंप आहे. आग पसरल्यास खबरदारी म्हणून पोलिसांनी सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्यांकरवी पुरवठा काही वेळ बंद केला. वाहतूकही अन्य मार्गाने वळवली. अग्निशामक दलाने वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला; तसेच घटनास्थळापासून काही अंतरावरच ट्रेझरी विभाग असून, त्यात महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम ठेवली जाते.

Web Title: Fire at Taddeo Transportation Office