क्‍यूआर कोडविनाच फटाके विक्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

हरित (कमी प्रदूषणकारी) फटाके ओळखण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) दिलेल्या निर्देशांनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वच फटाक्‍यांवर क्‍यूआर कोड छापणे बंधनकारक केले होते. मात्र, कोणत्याही फटाक्‍यांवर हा कोड नसल्याचे समोर आले आहे. 

नवी मुंबई : हरित (कमी प्रदूषणकारी) फटाके ओळखण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) दिलेल्या निर्देशांनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वच फटाक्‍यांवर क्‍यूआर कोड छापणे बंधनकारक केले होते. मात्र, कोणत्याही फटाक्‍यांवर हा कोड नसल्याचे समोर आले आहे. 

दिवाळीत फटाक्‍यांमुळे होणारे वायू प्रदूषण आणि ध्वनि प्रदूषण कळीचा मुद्दा ठरतो. त्यामुळे हरित फटाक्‍यांच्या निर्मितीसाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (निरी) या दोन्ही संस्था अनेक वर्ष काम करत होत्या. गेल्याच वर्षी त्यांना कमी प्रदूषण करणारे फटाके बनवण्यात यश मिळाले. तसेच फटाके निर्मिती करणाऱ्या इतर कंपन्यांबरोबर पर्यावरणास पूरक फटाके बनवण्याकरता सामंजस्य करारही करण्यात आला होता. फटाक्‍यांच्या बॉक्‍सवर फटाके बनवताना वापरण्यात आलेल्या घटकांची नोंद करणे याआधीच सक्तीचे करण्यात आले होते. यावर्षी मात्र हरित फटाक्‍यांचा दंडक ठरवण्यात आल्यानंतर फटाक्‍यांच्या बॉक्‍सवर क्‍यूआर कोड देणेही सक्तीचे करण्यात आले. जेणेकरून हरित फटाक्‍यांच्या नावाखाली होणारी प्रदूषणकारी फटाक्‍यांची विक्री थांबवणे शक्‍य होईल. तसेच पर्यावरणस्नेही फटाके चटकन ओळखता यावेत, याकरिता विशिष्ट लोगोदेखील फटाक्‍यांवर देण्यात येणार होता. मात्र, असा लोगो वा क्‍यूआर कोड दोन्हीही फटाक्‍यांवर नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

फटाके खरेदीचा उत्साह कमीच
दिवाळीत सुरू असलेल्या पावसाचा परिणाम यंदा फटाके बाजारावरही दिसून येत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाके विक्रीत घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आवाजी फटाक्‍यांना यंदा फार मागणी नसल्याचेही विक्रेते सांगतात.

हरित फटाके ही संकल्पना अजूनही जनमानसात रुजलेली नाही. आम्हालाही या फटाक्‍यांबद्दल नेमकी माहिती नाही. फटाक्‍यांच्या बॉक्‍सवर क्‍यूआर कोड सोडा, कुठलाही लोगो दिसत नाही.
- आकाश घाडगे, ग्राहक. 

वनिता व सोनी फटाक्‍यांच्या काही बॉक्‍सवर क्‍यूआर कोड आहे; तर स्टॅन्डर्डच्या काही फटाक्‍यांवर लोगो दिसतोय. इतर फटाक्‍यांवर क्‍यूआर कोड व लोगो दोन्हीही नाहीत.
- ओमकार बेर्डे, लक्ष्मी फायरवर्क्‍स, वाशी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fireworks sale without a QR code