विलेपार्ले गोळीबारामागे रवी पुजारीचा हात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

पाच आरोपी अट्टल गुन्हेगार 
गोळीबार प्रकरणाचा कट गुंड रवी पुजारीच्या सांगण्यावरून रचण्यात आला होता. पुजारीचे हस्तक आणि अटक आरोपी यांची गुजरातच्या तुरुंगात एकमेकांशी ओळख झाली होती. या प्रकरणातील धनपाल व्यतिरिक्त इतर सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. त्यांच्यावर हत्या, जबरी चोरी आदी गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. 

मुंबई - विलेपार्ले येथे गोळीबार झालेल्या हॉटेलची टेहळणी करणाऱ्या संशयित रिक्षाचालकाला शुक्रवारी (ता. 10) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातून अटक केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे. कुख्यात गुंड रवी पुजारीच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. 

धनपाल कृष्णा शेट्टीयार ऊर्फ डीके ऊर्फ लंगडा ऊर्फ अण्णा (48) असे अटक संशयिताचे नाव आहे. गोळीबार झालेल्या विलेपार्ले येथील हॉटेलच्या टेहळणीसह संशयिताने गोळीबारासाठी वापरलेली बंदूकही काही दिवस स्वतःकडे ठेवल्याचा खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांना संशय आहे. नुकतीच या प्रकरणी गुजरातमधील तुरुंगातून गोळीबाराचा कट रचणाऱ्या सुरेश पिल्लई आणि महंमद नबी नूर महंमद मोमीन या दोघांचा ताबा गुजरातमधील बोरवाड तुरुंगातून घेण्यात आला होता. तत्पूर्वी हॉटेलमध्ये गोळीबार करणाऱ्या मृत्युंजय दास याच्यासह सुरेश पुजारी व रमेश पुजारी यांना खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. 

आरोपी दासच्या चौकशीत धनपालचे नाव पुढे आले होते. मूळ पुण्यातील रहिवासी असलेल्या धनपालचे कांदिवलीतही येणे - जाणे होते. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने त्याला तीन वेळा चौकशीसाठी बोलावले होते; पण त्याने पोलिसांना चुकीची माहिती दिल्याने त्याच्यावरील संशय वाढला. अखेर त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली. 

पाच आरोपी अट्टल गुन्हेगार 
गोळीबार प्रकरणाचा कट गुंड रवी पुजारीच्या सांगण्यावरून रचण्यात आला होता. पुजारीचे हस्तक आणि अटक आरोपी यांची गुजरातच्या तुरुंगात एकमेकांशी ओळख झाली होती. या प्रकरणातील धनपाल व्यतिरिक्त इतर सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. त्यांच्यावर हत्या, जबरी चोरी आदी गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. 

Web Title: firing in mumbai