Mumbai : मुंबईत एसी डबल डेकर बस मधून प्रवाशांची मनसोक्त राईड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai bus

Mumbai:मुंबईत एसी डबल डेकर बस मधून प्रवाशांची मनसोक्त राईड

मुंबई - बेस्टच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावली. बेस्ट बस क्रमांक ११५ च्या सीएसटी ते एनसीपीए या मार्गावर पहिली बस सकाळी धावली. बेस्ट बसला पाहण्यासाठी तसेच बस सोबत फोटो करणारी गर्दी आज सकाळपासूनच दिसली.

बसच्या धावण्याच्या मार्गावरही बसकडे अतिशय कुतुहलपूर्वक तसेच आनंदाने पाहणारे मुंबईकर यानिमित्ताने पहायला मिळाले. नव्या डबल डेकर एसी बसचे स्वागत मुंबईकरांनी जोरदारपणे केले.

आजच्या पहिल्या दिवशी कार्ड आणि चलो एप पेमेंट सोबतच रोख पैसे घेऊनही प्रवासाची सुविधा या बसमध्ये देण्यात आली होती. त्यामुळे मुंबईकरांनी पहिल्या फेरीपासूनच वरच्या डेकला पसंती देत प्रवासाचा आनंद घेतला. बससाठी खालच्या आसनव्यवस्थेपेक्षा वरच्या डेकवरच प्रवाशांनी प्रवासाला पसंती दिली.

आधीच्या बसच्या तुलनेत नव्या बसमध्ये अधिक खुली जागा आहे. मुंबईतल्या डबल डेकर बसने प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असल्याचे रूतुजा पाटील या प्रवाशाने सांगितले. तर मुंबईतील उकाडाच्या वातावरणात एसी बसमध्ये गारेगार प्रवास करण्याचा अनुभव हा अतिशय आनंदी होता,

अशी प्रतिक्रिया राजश्री पाटील या विद्यार्थीनीने दिली. इतर एसी बसच्या तुलनेत प्रवाशाच्या डोक्यावर एसी ब्लोअरची जागा नाही. मध्यवर्ती एसी असल्याने बसमध्ये काचेच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाची घुसमट होत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

प्रत्येक अर्ध्या तासाने या बसेसची फेरी सुरू झाली आहे. पहिली बस सकाळी ८.४५ वाजता धावली. या बसमध्ये एकुण ७८ जणांची क्षमता आहे. त्यामध्ये बसणाऱ्या प्रवाशांसह उभ्या प्रवाशांचाही समावेश आहे.

परंतु वरच्या डेकवर उभ्या प्रवाशांना प्रवासाची संधी मिळणार आहे. सकाळी ८.४५ वाजता पहिली बस धावली, तर रात्री ८ वाजेपर्यंत ही डबल डेकर बस धावणार आहे. मार्चअखेरीपर्यंत आणखी ३ ते ४ डबल डेकर बस या बेस्टच्या ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे.