पहिली खासगी एक्‍स्प्रेस आठवडाभरात रुळावर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

या गाडीतील आसनासाठी 1700 ते 2000 रुपये तिकीट असेल

मुंबई : मुंबई-अहमदाबाद तेजस एक्‍स्प्रेस ही या भागातील पहिली खासगी रेल्वेगाडी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात धावण्याची दाट शक्‍यता आहे. या गाडीतील आसनासाठी 1700 ते 2000 रुपये तिकीट असेल. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार तिकीट दरात वाढ केली जाईल.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉपोर्रेशनतर्फे (आयआरसीटीसी) देशातील काही प्रमुख मार्गांवर खासगी तत्त्वावर तेजस एक्‍स्प्रेस चालवण्यात येत आहेत. त्यापैकी एक खासगी गाडी मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. या एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सेवा-सुविधा पुरवण्यात येतील.

अहमदाबादहून सकाळी 6.40 वाजता सुटणारी तेजस एक्‍स्प्रेस मुंबईत दुपारी 1.15 वाजता दाखल होईल. मुंबईतून दुपारी 3.40 वाजता रवाना झालेली ही गाडी अहमदाबादला रात्री 10.25 वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला 10 चेअर कार आणि दोन एक्‍झिक्‍युटिव्ह कोच जोडले जातील. तेजस एक्‍स्प्रेस गुरुवारवगळता आठवड्यातील अन्य सर्व दिवशी धावणार आहे. 

तेजस एक्‍स्प्रेसमधील सोईसुविधा 
- मोफत वाय-फाय 
- सुसज्ज ग्रंथालय 
- टीसींकडे अद्ययावत मशीन 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first private train Mumbai Ahamdabad