सहा डब्यांची मेट्रो जुलै 2020 मध्ये मुंबईत दाखल होणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

मेट्रो मार्ग - 2अ, 2ब आणि 7साठी 378 डबे बनविण्याची जबाबदारी प्राधिकरणाने मे. बी.ई.एम.एल.यांच्यावर सोपविली आहे. या कराराची किंमत 3015 कोटी रुपये इतकी आहे. 6 डब्यांच्या 63 ट्रेन्स तयार करण्यात येणार आहेत.

मुंबई : मेट्रो मार्ग - 2अ, 2ब आणि 7च्या कामाला वेग आला असून रुळ टाकण्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. मुंबईकरांना लवकरात लवकर मेट्रो प्रवासाचा आनंद देण्याचे शिवधनुष्य प्राधिकरणाने उचलले असून, जुलै 2020 मध्ये मुंबईत पहिली 6 डब्यांची मेट्रो दाखल होणार असल्याची माहिती महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली. 

दहिसर ते डी एन नगर आणि डी एन नगर ते मंडाले मेट्रो मार्ग - 2अ, 2ब तसेच बोरिवली पूर्व ते अंधेरी (पश्चिम दृतगती महामार्ग) या मेट्रो मार्गावर रुळ टाकण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. हे काम लवकरच पूर्णत्वास जाईल, असा विश्वास प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. दुसरीकडे या मार्गासाठी मेट्रो डबे बनविण्याच्या कामालाही प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. मेट्रो डबे बनविणाच्या पहिल्या वेल्डिंग उपक्रमाला महानगर आयुक्त आर.ए.राजीव, दुर्गा शंकर मिश्रा, सचिव, गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय आणि मंगु सिंग व्यवस्थापिकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी नुकतीच भेट दिली.

मेट्रो मार्ग - 2अ, 2ब आणि 7साठी 378 डबे बनविण्याची जबाबदारी प्राधिकरणाने मे. बी.ई.एम.एल.यांच्यावर सोपविली आहे. या कराराची किंमत 3015 कोटी रुपये इतकी आहे. 6 डब्यांच्या 63 ट्रेन्स तयार करण्यात येणार आहेत. या शिवाय अतिरिक्त मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण लक्षात घेऊन प्राधिकरणाने आणखी 21 ट्रेन्स (126 डबे) मे.बी.ई.एम.एल.कडून मागविल्या आहेत. यामुळे मेट्रोचे डबे बनविण्याची भारतातील सर्वात मोठे कंत्राट मे. बी.ई.एम.एल.या कंपनीला देण्यात आले आहे. सप्टेंबर 2019 पर्यंत डब्याचा नमुना तयार होणे अपेक्षित आहे.

मेट्रो डब्यांची वैशिष्ट्ये :
1. प्राधिकरणाने अद्ययावत ट्रेन्सची मागणी केलेली आहे. यामुळे त्यांची विश्वासार्हता तर वाढतेच शिवाय या ट्रेन्स पर्यावरण पूरकही ठरणार आहेत.
2. मेट्रो ट्रेन्समध्ये संवादावर आधारित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
3. डबे अद्ययावर, हलके आणि ऊर्जा वाचविणारे आहेत.
4. पूर्णपणे स्वयंचलित व चालकरहित ट्रेन्स.
5. ट्रेन्स स्टेनलेस स्टीलच्या व 3.20 मी. रूंद असतील.
6. 334 प्रवासी बसू शकतील. 
7. एकूण 2092 प्रवासी 6 डब्याच्या ट्रेन्समधून प्रवास करू शकतील.
8. रिजनरेटीव ब्रेकिंग सुविधा उपलब्ध.
9. 25 केव्ही एसी ट्रॅक्शनवर ट्रेन्स चालणार. 
10. व्हीलचेअरसाठी जागा उपलब्ध.
11. डब्यांबाहेर सी.सी.टी.व्ही.
12. महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था. 

प्रवासी सुरक्षा :
•    चालक-प्रवासी संवाद शक्य 
•    प्रवाशांना माहिती पुरविण्याची सुविधा उपलब्ध
•    स्वयंचलित घोषणा उपलब्ध
•    प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स उपलब्ध


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first six metro metro will arrive in Mumbai in July 2020